शेतकऱ्यांचा विद्युत अभियंत्याला घेराव
By Admin | Updated: September 29, 2014 22:54 IST2014-09-29T22:54:02+5:302014-09-29T22:54:02+5:30
नजीकच्या वंडली शेतशिवारात वारंवार कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पिके सुकू लागली आहेत. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी गाडेगाव उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंत्याला घेराव घालून

शेतकऱ्यांचा विद्युत अभियंत्याला घेराव
राजुराबाजार : नजीकच्या वंडली शेतशिवारात वारंवार कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पिके सुकू लागली आहेत. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी गाडेगाव उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंत्याला घेराव घालून तातडीने वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी केली.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील वंडली शेतशिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याबाबत वारंवार लेखी तक्रारी देऊनही वीज वितरण कंपनीने दखल घेतली नाही. वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांना कपाशी, मिरची, संत्रा, सोयाबीन आदी पिकांसाठी शेतकऱ्यांना ओलीत करावे लागते.
परंतु वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकरी वैतागले आहेत. चार पाच महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होणे ही नित्याची बाब झाली आहे. परिणामी शेती पिकाला पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे गाडेगाव उपकेंद्र गाठून कनिष्ठ अभियंत्याला घेराव घातला व तातडीने वीजपुरवठा नियमित सुरु करण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्यास वीज कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनामध्ये वंडली येथील शेतकरी चंद्रशेखर भोकरे, नीलेश इसळ, देवीदास कळसकर, धनराज वानखडे, श्याम चरपे, महादेव भोंडे, गजानन पेठे, साहेबराव वानखडे, योगेश कडू, केशव धामंदे, सुरेंद्र वानखडे, दिनेश बेले, विठ्ठल भोंड, नामदेव ठाकरे, प्रमोद वानखडे, गोपाल इंगळे आदींचा समावेश होता. (वार्ताहर)