अमरावती : चार वर्षांत प्रथमच १० तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात भूजलस्थिती खालावलेली नाही. मात्र, भूजलस्थिती इतकीही उत्तम नाही. सद्यस्थितीत केवळ भातकुली, चांदूर रेल्वे व चांदूर बाजार तालुक्यात १.२० मीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. उर्वरित ११ तालुक्यांत मात्र भूर्गभातील पाण्याची पातळी ०.५० मीटरचे आतच असल्याने मार्चपश्चात जिल्ह्यास पाण्याची टंचाई जाणवणार आहे.
जिल्ह्यात डिसेंबरपर्यत ९३१.० मिमीच्या तुलनेत ८७८.७ मिमी पाऊस झालेला आहे. ही ९४.३ टक्केवारी आहे. यात सर्वाधिक ८८४.७ मिमी म्हणजेच सरासरीच्या १३२.६ मिमी पाऊस दर्यापूर तालुक्यात, तर सर्वात कमी पाऊत मेळघाटात झालेला आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ७५२.२ मिमी (६७.५ टक्के)व चिखलदरा तालुक्यात ८४३.२ मिमी ( ५६.९ टक्के) पाऊस झालेला आहे.
गतवर्षी १२ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. या महिन्यात पावसाचे १७ दिवस राहिले व सरासरीच्या १३१ टक्के पाऊस पडला. जुलै महिन्यात २३ दिवस पाऊस पडला. यात सरासरीच्या ९८ टक्के पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात १८ दिवस पावसाचे राहिले व सरासरी ७७ टक्के पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात १६ दिवस पाऊस पडला व सरासरीच्या ९३.१० टक्के पावसाची नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यात सात दिवस पावसाचे राहिले व सरासरीच्या ९०.२ टक्के पाऊस पडला. तसे पाहता मागील वर्षी पावसाळा पश्चात मान्सूनच्या परतीचा पाऊस जिल्ह्यात चांगला झाल्याने सुरुवातील भूजलात कमी व ऑक्टोबरपासून भूजलाचे पुनर्भरण झाले. यापूर्वी सलग चार वर्षे भूजलात कमी आल्यामुळे सध्या तीन तालुक्यांत १.२० मीटरपर्यंत वाढ व ११ तालुक्यांत ०.५० मीटरपर्यंत वाढ दिसून येत आहे.
बॉक्स
सरासरी ०.५० मीटर भूजल पातळीत वाढ
‘जीएसडीए’द्वारा १४ तालुक्यांतील १५० निरीक्षण विहिरीच्या पाहणीअंती जिल्ह्यात सरासरी ०.५० मीटरपर्यंत भूजलात वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. सद्यस्थितीत भातकुली १,०४ मी., चांदूर रेल्वे १.३४ मी व चांदूर बाजार तालुक्यात १.०३ मीटर भूजल पातळी आहे. याशिवाय अमरावती ०.२०, नांदगाव खंडेश्वर व तिवसा ०.३४, मोर्शी ०.५६, वरुड ०.६१, अचलपूर ०.००, दर्यापूर ०.१९ , अंजनगाव ०.१५, धारणी०.२९, चिखलदता ०.०५ व धामणगाव तालुक्यात ०.५० मीटरपर्यंत भूजलात वाढ झालेली आहे.
बॉक्स
भूजलाचे व्यवस्थापन महत्त्वाचे
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत भूजलाचा अनिर्बंध उपसा होत आहे. त्यातुलनेत पुनर्भरण होत नाही. भूजलस्रोत कायम टिकविणे व पुनर्भरणात होणारी तूट भरून काढण्यासाठी कृत्रिम पुनर्भरणाच्या योजना राबविणे महत्त्वाचे आहे. याशिवाय गावोगावी होणारे बोअर व त्याद्वारे होणाऱ्या उपस्यावरदेखील बंधने आणणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी मोर्शी व वरूड तालुक्यात भूजलाच्या अमर्याद उपस्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंधने आणली होती.