तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:13 IST2021-04-09T04:13:25+5:302021-04-09T04:13:25+5:30

फोटो ०८एएमपीएच०९ कॅप्शन - व्हीसीद्वारे आढावा घेताना ना. यशोमती ठाकूर व प्रधान सचिव आय.ए. कुंदन अमरावती : महिलांची कामाच्या ...

Grievance Redressal Committees should be set up immediately | तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत करा

तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत करा

फोटो ०८एएमपीएच०९

कॅप्शन - व्हीसीद्वारे आढावा घेताना ना. यशोमती ठाकूर व प्रधान सचिव आय.ए. कुंदन

अमरावती : महिलांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत कराव्यात. चुकीचे काम करणाऱ्या कोणाही व्यक्तीस पाठीशी घालण्याचा प्रयत्न होता कामा नये, तसेच कोणीही पीडित महिला न्यायापासून वंचित राहू नये, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिले.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन अंतर्गत तक्रार निवारण समित्यांच्या अनुषंगाने ना. ठाकूर यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यावेळी उपस्थित होत्या. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणापासून संरक्षण यासंर्दभात विभागनिहाय किती समित्या स्थापन झाल्या याची माहिती घेऊन उर्वरित समित्या १० दिवसांच्या आत स्थापन कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्तांनी जातीने लक्ष घालून अधिनस्त सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची कार्यवाही गतीने होईल याची दक्षता घ्यावी. तसेच स्थापन झालेल्या परंतु, कार्यान्वित नसलेल्या समित्या पुनरुज्जीवित कराव्यात. समित्यांच्या अध्यक्षांचे संपर्क क्रमांकासह समित्यांची यादी सचिव कार्यालयाला पाठवावी. ही माहिती वेबपोर्टल तयार करण्यासाठी उपयोगात आणली जाणार असून संकटग्रस्त महिला अधिकारी, कर्मचारी यावर संपर्क साधून मदत मिळवू शकतील, असे ना. ठाकूर यांनी सांगितले.

बॉक्स

‘शी’ बॉक्समधील तक्रारीचे होणार निराकरण

अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन करून त्याबाबतच्या माहितीचे फलक सर्व संबंधित कार्यालयांच्या दर्शनी भागात लावण्यात यावेत. समितीतील समाविष्ट सर्व घटकांचे प्रशिक्षण आयोजित करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहील. तसेच जाणीव जागृती साहित्य तयार करून वितरण करावे, प्रसिद्धी करावी. 'शी बॉक्स'मध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे सनियंत्रण योग्यरीत्या होण्यासाठी त्याचे युजर आयडी, पासवर्ड जिल्हाधिकाऱ्यांनाही द्यावेत, असे निर्देश ना. ठाकूर यांनी दिले.

Web Title: Grievance Redressal Committees should be set up immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.