अमरावतीत ७२ आसनी विमानसेवेला ‘ग्रीन सिग्नल’
By Admin | Updated: July 3, 2016 23:59 IST2016-07-03T23:59:12+5:302016-07-03T23:59:12+5:30
येथील बेलोरा विमानतळाहून ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

अमरावतीत ७२ आसनी विमानसेवेला ‘ग्रीन सिग्नल’
अमरावती : येथील बेलोरा विमानतळाहून ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमरावतीकरांना लवकरच विमान सेवेची संधी मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाचा चमुने मे महिन्यात बेलोरा विमानतळाची पाहणी करून येथे विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची चाचपणी केली होती. त्यानुसार चार सदस्यीय चमुने बेलोरा विमानतळाची पाहणी करून ७२ आसनी विमानसेवा (एटीआर) सुरू करण्यास होकार दर्शविला आहे. मात्र, बेलोरा विमानतळाहून विमानाचे ‘टेकआॅफ’ आणि ‘लॅडिंग’ करताना भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता धावपट्टीची लांबी वाढविणे गरजेचे राहील, असे या चमुने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. विमानतळाच्या पश्चिम भागातील सीमेकडील चार हेक्टर जागा संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. विमानतळाचा पाहणीवजा वस्तुनिष्ठ अहवाल एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे आयटीजीएम व्ही.के.मिश्रा, असिस्टंट जीएम एम.पी. अग्रवाल, वास्तुशिल्पकार मार्क एक्का, वरिष्ठ प्रबंधक एन.के.गुप्ता यांनी राज्य शासन आणि महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाला सोपविला आहे.
एअरपोर्ट अॅथॉरिटी चमुच्या अहवालात बेलोरा विमानतळावर धावपट्टीची लांबी, विजेचे काम, एटीएस टॉवर, ‘रन-वे’वर लाईट, टर्मिनल इमारत, विमानतळ सीमेवर प्रकाश व्यवस्था, जळू ते बेलोरा वळण रस्ता आदी प्रस्तावित विकासकामे त्वरेने सुरूकरण्याचे सुचविले आहे. बेलोरा विमानतळाकडे २८३ हेक्टर जमीन असल्याने विस्तारिकरणात अडचण नाही. त्यामुळे येत्या काळात बेलोरा विमानतळाहून आंतरराज्यीय विमानसेवा सुरू करण्यास हरकत नाही. प्रस्तावित ७२ आसनी विमानसेवा सुरू करण्याचे एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने अहवालात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
धावपट्टीचा विस्तार : एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाचा राज्य शासनाला अहवाल
आॅगस्टपासून विमानतळावर कामे सुरू होतील
आॅगस्ट महिन्यापासून बेलोरा विमानतळावर विविध विकासकामांना प्रारंभ होईल, असे संकेत बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम.पी.पाठक यांनी दिलेत. बेलोरा विमानतळावर हल्ली १८५० मीटर धावपट्टी असून प्रवासी विमानसेवा सुरु करण्यासाठी किमान २२०० मीटर धावपट्टी तयार केली जाणार आहे. त्यानुसार २२०० मीटर धावपट्टी तयार करण्याचे देखील एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने प्रस्तावित केले आहे.
विमानतळाहून ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्यास एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने होकार दर्शविला आहे. काही जमीन संपादित केली जाणार आहे. प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे हे संकेत आहेत.
- एम.पी.पाठक, प्रबंधक, बेलोरा विमानतळ