‘प्रश्नचिन्ह’कडून फासेपारधींना उच्चशिक्षणापर्यंत नेण्याचे महत्कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:15 IST2021-09-24T04:15:05+5:302021-09-24T04:15:05+5:30
मेधा पाटकर, मंगरूळ चव्हाळा येथे आश्रमशाळेच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थिती मंगरूळ चव्हाळा-नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे ...

‘प्रश्नचिन्ह’कडून फासेपारधींना उच्चशिक्षणापर्यंत नेण्याचे महत्कार्य
मेधा पाटकर, मंगरूळ चव्हाळा येथे आश्रमशाळेच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थिती
मंगरूळ चव्हाळा-नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे प्रश्नचिन्ह आश्रमशाळेने फासेपारधींना उच्चशिक्षणापर्यंत नेण्याचे महत्कार्य केले, असे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी केले.
तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील आश्रमशाळेच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्याला मेधा पाटकर यांनी उपस्थिती लावली होती. संपूर्ण देशात जवळपास १३ कोटी फासेपारधी बांधव वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने राहतात. पण, शासनाने त्यांची तशी नोंदच ठेवली नाही आणि त्यांच्या पर्यंत कोणताही विकास पोहोचला नाही. आता २० किलोमीटरचा फेरा वाचविण्यासाठी महामार्गासाठी आश्रमशाळा उद्ध्वस्त झाली. रेणके कमिशनच्या शिफारशी लागू केल्या असत्या, तर आदिवासींचे अनेक प्रश्न निकाली निघाले असते. ‘लढेंगे-जितेंगे, प्रश्नचिन्ह को आगे बढाएंगे’ असे म्हणत शाळेच्या अनेक प्रश्नांसंदर्भात मतीन भोसलेंना मदत करून प्रश्न निकाली काढण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे मेधा पाटकर म्हणाल्या. याप्रसंगी सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांनी प्रबोधनातून उपस्थितांची मने जिंकली. आयोजक तथा आदिवासी फासेपारधी सुधार समितीचे अध्यक्ष मतीन भोसले प्रास्ताविकात फक्त मंगरूळ चव्हाळाच नव्हे, तर राज्यभरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक व इतर ठिकाणी भीक मागून जगत असलेले मुलेमुली यांना गोळा करून त्यांनासुद्धा ज्ञानदानाचे ध्येय स्पष्ट केले. धान्य व किराण्याची मदत करणारा गावातील पहिली व्यक्ती कॉम्रेड गणेश अवझाडे असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांनी या दोन वर्षात प्रश्नचिन्ह चे व फासेपारधी समाजाचे सर्व प्रश्न निकाली काढणार असल्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय सेवा दलाचे माजी राज्य अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांनी अध्यक्षीय भाषणात हातभार लावून आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
राज्य कर आयुक्त पाचारने, डॉ. वनकर, विनोद शिरसाठ, प्रमोद काळबांडे, मैत्रेय मांदियाळी प्रतिष्ठानचे अजय किंगरे, मिशन आय.ए.एस. ॲकेडमीचे नरेशचंद्र काठोळे, ब्ल्यू टायगर फोर्सचे राज्य अध्यक्ष ॲड. सुधीर तायडे, पंचायत समितीचे माजी सदस्य कॉम्रेड गणेशराव अवझाडे, डॉ. मंगेश पचगाडे, आदिवासी पारधी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक बबन गोरामन, डिगांबर काळे, बाबूसिंग पवार, धर्मराज भोसले, सरपंच नीलेश निंबर्ते व श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटना आणि प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेची शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.