नातवानेच केला आजीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST2021-07-10T04:10:19+5:302021-07-10T04:10:19+5:30
मोबाईल विकत घेण्यासाठी सोन्याची पोत चोरली : अंत्यसंस्कारातून मिळाला सुगावा, २४ तासात उलगडा ब्राह्मणवाडा थडी : येथील ७५ वर्षीय ...

नातवानेच केला आजीचा खून
मोबाईल विकत घेण्यासाठी सोन्याची पोत चोरली : अंत्यसंस्कारातून मिळाला सुगावा, २४ तासात उलगडा
ब्राह्मणवाडा थडी : येथील ७५ वर्षीय वृद्धेचा तिच्या नातवानेच खून केल्याचा उलगडा पोलीस तपासात झाला आहे. साध्या वेशातील पोलीस त्या वृद्धेच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले. त्यातील चर्चेनुसार, पोलिसांनी आरोपी नातवाला ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. सुरज प्रल्हाद अमझरे (२९, रा. भोईपुरा, ब्राह्मणवाडा थडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी त्याला अटक करण्यात आली.
८ जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ७५ वर्षीय गिरीजा आण्याजी अमझरे या वृद्धेचा खून झाला. तर, महिलेच्या गळ्यातील पोत गहाळ असल्याचे पंचनाम्यादरम्यान सांगण्यात आले. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा खून झाला असावा, या शक्यतेने पोलिसांनी चौकशी तथा तपासाला वेेग दिला.
सकाळी दहा वाजता दरम्यान राहत्या घरी खून झाल्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी यांनी एलसीबी व स्थानिक पोलिसांना आरोपीचा शोध लावून अटक करण्याचे आदेश दिले होते. यानुसार स्थानिक पोलिस स्टेशनचे ठाणेदार दीपक वळवी, पीएसआय संजय शिंदे, त्र्यंबक सोळुंके, कैलास खेडकर यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला शुक्रवारी दुपारी अटक केली. आरोपीकडून मृत महिलेच्या गळ्यातील चोरी गेलेली सोन्याची पोत व खून करण्यासाठी वापरलेला सराटा ताब्यात घेतला. आरोपीने सोन्याची पोत ही पाणीपुरवठ्याच्या विहिरी शेजारील दगडाखाली लपवून ठेवली होती. तर खून करण्यासाठी वापरलेला सराटा हा घराबाजूनी असलेल्या लेआउटमधील नालीत फेकून दिला होता.
असा झाला उलगडा
आरोपी हा मयत आजीच्या अंत्यसंस्कारामधून घरी आल्यानंतर तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून घरामध्ये झोपून राहिला. पीएसआय शिंदे व त्यांचे सहकारी कैलास खेडकर, त्र्यंबक सोळुंके हे अंत्यसंस्कारात साध्या गणवेशात सामील झाले होते. पीएसआय शिंदे यांनी तर मृत महिलेचे पतीला छत्रीचा सहारा दिला. तेथे झालेल्या चर्चेवरून पीएसआय शिंदे यांचा संशय बळावला. आरोपी सुरज प्रल्हाद अमझरे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.