चोरट्यांकडून ग्रामपंचायतीचा मोटरपंप, महावितरणचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:12 IST2021-04-13T04:12:41+5:302021-04-13T04:12:41+5:30
बेनोडा पोलिसांची कारवाई, मध्यवर्ती कारागृहातून पोलीस कोठडी वरूड/बेनोडा : वरूड तालुक्यातील बारगावला पाणीपुरवठा करणारा ग्रामपंचायतीचा साडेसात अश्वशक्तीचा पाणबुडी ...

चोरट्यांकडून ग्रामपंचायतीचा मोटरपंप, महावितरणचे साहित्य जप्त
बेनोडा पोलिसांची कारवाई, मध्यवर्ती कारागृहातून पोलीस कोठडी
वरूड/बेनोडा : वरूड तालुक्यातील बारगावला पाणीपुरवठा करणारा ग्रामपंचायतीचा साडेसात अश्वशक्तीचा पाणबुडी मोटरपंप व महावितरणच्या मांगरुळी केंद्राचे संगणक राऊटर चोरणाऱ्या चोरट्यांना बेनोडा पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले. पोलीस कोठडीदरम्यान त्यांच्याकडून ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बेनोडा पोलीस ठाण्यात यासंदर्भात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जिल्हा कारागृहात असल्याच्या माहितीवरून बेनोडा पोलिसांनी न्यायालयाकडून त्यांची पोलीस कोठडी मिळविली. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गराड, पोलीस कर्मचारी सुनील केवतकर, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, संतोष तेलंग, बळवंत दाभणे हे या प्रकरणाचा तपास करीत होते. अशोक मोहन युवनाते (२८, रा. पांढरघाटी, ता. वरूड), रवि ऊर्फ रवींद्र रेवांश युवनाते (२४, रा. मैनीखापा, ता. पांढुर्णा) अशी त्यांची नावे आहेत. हे आरोपी कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात घडलेल्या प्रकरणात कारागृहात होते.
ठाणेदार मिलिंद सरकटे, सहायक उपनिरीक्षक दिलीप वासनकर, अशोक वाकेकर, दिवाकर वाघमारे, प्रदीप खेरडे, अंकुश वानखडे, राहुल केंडे यांनी कारवाई केली. त्यांच्याकडून आणखी अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता बेनोडा पोलिसांनी वर्तविली आहे.