ग्रामपंचायत निवडणूक : 'कहीं खुशी, कहीं गम'
By Admin | Updated: April 24, 2015 00:12 IST2015-04-24T00:12:26+5:302015-04-24T00:12:26+5:30
जिल्ह्यातील ५३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून सुरू झाली.

ग्रामपंचायत निवडणूक : 'कहीं खुशी, कहीं गम'
अमरावती : जिल्ह्यातील ५३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून सुरू झाली. अर्ध्या तासात ग्रामपंचायतींचे निकाल बाहेर येऊ लागले, तसातसा तरुणाईचा जल्लोष वाढला. दुपारी ३ वाजेपर्यंत ही मतमोजणी सुरू होती. या निवडणुकीत काही ठिकाणी प्रस्थापितांना धूळ चारीत विरोधकांनी बाजी मारली, तर कुठे प्रस्थापित पॅनेलचा दबदबा कायम राहिला. समान मते मिळालेल्या जागांसाठी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली.
प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या ही ग्रामपंचायत निवडणुकीत तिवसा तालुक्यात आ. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात अनेक ठिकाणी काँग्रेसला बहुमत प्राप्त झाले. स्थानिक पॅनेललाही अनेक ठिकाणी कौल मिळाला. सुरवाडी, कुऱ्हा, तळेगाव ठाकूर, शेंदूरजना बाजारसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये सत्तापालट झाली आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या दर्यापूर तालुक्यात येवदा येथे विद्यमान सरपंच बाळासाहेब राऊत, प्रदीप देशमुख यांचे पॅनेल विजयी झाले. या तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापित पॅनेलला मात देण्यात आली. माजी जि.प. सदस्य बळवंत वानखडे यांच्या पॅनेलने लेहेगावमध्ये बाजी मारली. पथ्रोटग्रामपंचायतीमध्ये १५ वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला गड प्रथमच हिरावला गेला आहे.
स्थानिक आघाडी, पॅनेलची बाजी
गावपातळीवरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी लक्ष ठेवून होते. अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्याच इशाऱ्यावर तडजोड झाली. स्थानिक गटांमध्ये तडजोड होऊन तयार झालेल्या आघाडी, युती, पॅनेलने बाजी मारली. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे.
२७० ग्रामपंचायतींमध्ये 'महिलाराज'
जिल्ह्यात ५३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूक पार पडल्या. यापैकी २७० ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या अंतिम क्षणात महिला आरक्षण घोषित झाल्याने अनेकांचा हीरमोड झाला तर अनेक ग्रामपंचायतींमध्ये सक्षम महिला उमेदवार मिळू शकले नाही. सरपंचपदाच्या निवडीकरिता तारीख जाहीर झाली असल्याने तोपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
(प्रतिनिधी)