जिल्ह्यातील ग्रामपंचायती होणार ओडीएफ प्लस..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:18 IST2021-08-18T04:18:10+5:302021-08-18T04:18:10+5:30
अमरावती : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हागणदारीमुक्त गावांत सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य जिल्ह्यात वेग घेत आहे. आता ...

जिल्ह्यातील ग्रामपंचायती होणार ओडीएफ प्लस..!
अमरावती : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हागणदारीमुक्त गावांत सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य जिल्ह्यात वेग घेत आहे. आता जिल्ह्यातील १० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस) घोषित करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सद्यस्थितीत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) २ ची अंमलबजावणी सुरू असून, जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये शाश्वत स्वच्छतेच्या अनुषंगाने कामे सुरू आहेत. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासोबतच, शाळा अंगणवाडी व गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर व त्यासंबंधीची जाणीव जागृती, सार्वजनिक तसेच वैयक्तिक शोषखड्डे, स्थिरीकरण तळे, प्लास्टिक कचरा वर्गीकरण संकलन आणी साठवण सुविधा आदी निकषांची पूर्तता करणारी गावे हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यात येणार आहेत.
बॉक्स
या ग्रामपंचायतींचा समावेश
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या असून, त्यात धनोडी, सावंगा ता. वरूड, गोविंदपूर ता. चांदूर बाजार, बोरगाव निस्ताने ता. धामणगाव रेल्वे, सावळी दतुरा ता. अचलपूर, पार्डी ता. अमरावती, लेहगाव, सावरखेड ता. मोर्शी, मोखड, ता. नांदगाव खंडेश्वर, खीरगव्हाण ता. अंजनगाव यांचा समावेश आहे.
बाॅक्स
ओडीएफ प्लस म्हणजे काय?
हागणदारीमुक्त अधिक म्हणजेच ओडीएफ प्लस. हागणदारीमुक्त झालेल्या गावांत शाश्वत स्वच्छता कायम ठेवण्यासोबतच सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा नियमित वापर, शाळा अंगणवाडी तसेच गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या सोयी सुविधा आणी गावाची दृश्यमान स्वच्छता कायम राखणे होय.
कोट
शाश्वत स्वच्छतेच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींनी कार्याची दिशा ठरवत, आपले गाव ओडीएफ प्लस होण्यासाठी पुढाकार घ्यावा. शौचालयांचा नियमित वापर, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, शाळा अंगणवाडी व इतर अनुषंगिक बाबींची पूर्तता करीत गाव हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत.
- अविश्यांत पंडा,
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद