होळीच्या दिवशी धान्याची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:13 IST2021-03-31T04:13:06+5:302021-03-31T04:13:06+5:30
शेतकरी हवालदिल, मदतीची मागणी : रासेगाव व कारंजखेडा येथील घटना परतवाडा : अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे शॉर्टसर्किटमुळे दोन एकरातील ...

होळीच्या दिवशी धान्याची राखरांगोळी
शेतकरी हवालदिल, मदतीची मागणी : रासेगाव व कारंजखेडा येथील घटना
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे शॉर्टसर्किटमुळे दोन एकरातील गहू जळून खाक झाला, तर चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा येथे दोन आदिवासी भावंडांच्या शेतातील कापून गंजी लावलेला गहू व हरभरा जळून राख झाल्याची घटना रविवारी होळीच्या दिवशी घडल्या.
रासेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीकांत जयप्रकाश अडगोकर यांच्या मालकीच्या शेतातील २८ मार्च रोजी रात्री शार्ट सर्कीटमुळे दोन एकरांतील गहू जळून राख झाला. या गरीब शेतकऱ्याचे आगीत अंदाजे ६० हजारांचे नुकसान झाले. रासेगाव येथील महावितरण कार्यालयात शेतकऱ्याने तक्रारसुद्धा दिली होती. त्या तक्रारीची दखल महावितरणे घेतली नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान झेलावे लागल्याचा आरोप करण्यात आला. नुकसानभरपाईची मागणी शेतकरी श्रीकांत अडगोकर यांनी केली आहे.
बॉक्स
कारंजखेडा येथे गहू, हरभरा गंजीची होळी
होळीच्या दिवशी चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम कारंजखेडा येथे गोगा कासदेकर व रामजी कासदेकर या भावंडांनी शेतात गहू, हरभरा पिकाची कापणी करून मळणीसाठी गंजी लावून ठेवली होती. रविवारी दुपारी दोन वाजता अचानक आग लागल्याने संपूर्ण धान्य जळून राख झाले. लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनेने आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकांची होळी झाली. ही आग परिसरातील आदिवासी शेतकरी व ग्रामस्थांच्या दिसताच त्यांनी नजीकच्या विहिरीवरील पाणी आणून आग नियंत्रणात आणली. तोपर्यंत सर्व धान्याची राखरांगोळी झाली होती. याची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून, मदतीची मागणी करण्यात आली आहे.
----------