‘आपली परिवहन’ला जीपीएस ट्रॅकिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:31 IST2017-10-17T23:31:36+5:302017-10-17T23:31:57+5:30
खासगी अभिकर्त्याकडून चालविण्यात येणाºया ‘आपली परिवहन’ सेवेतील शहर बसेसला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम लावले जाणार आहे.

‘आपली परिवहन’ला जीपीएस ट्रॅकिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासगी अभिकर्त्याकडून चालविण्यात येणाºया ‘आपली परिवहन’ सेवेतील शहर बसेसला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम लावले जाणार आहे. याबाबत महापालिकेच्या कार्यशाळा विभागाने पृथ्वी टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सला पत्र दिले असून, महिन्याअखेरीस शहर बसमध्ये ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित होईल.
महापालिका क्षेत्रात शहर बस चालविण्याकरिता महापालिकेने स्थानिक पृथ्वी टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्ससोबत करारनामा केला आहे. शहर बसेसच्या माध्यमातून महापालिकेला पृथ्वी ट्रॅव्हल्सकडून ६ ते ६.५० लाख रॉयल्टी मिळते. तूर्तास महापालिका हद्दीतील १६ रस्त्यांवर २५ शहर बस धावतात. मात्र, पृथ्वी ट्रॅव्हल्सने करारनाम्याप्रमाणे आणखी १५ बस अद्यापही आणल्या नाहीत. याशिवाय शहर बस सेवेविरोधात तक्रारींचा ओघ वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर बसचे आॅनस्पॉट इन्स्पेक्शन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यातही अनेक त्रुट्या आढळून आल्या होत्या. वेळापत्रकाप्रमाणे मंजूर असलेल्या मार्गावर शहर बस धावत नसल्याचे, वाहकांजवळ तिकिटांचे योग्य सिरीज नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. बसेससह डिस्प्ले बोर्डची स्थितीही तपासण्यात आली होती. या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर ‘पृथ्वी’च्या २५ बसेसला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, ते कार्यान्वित करण्यासाठी पृथ्वी टूर्सला पत्र दिले आहे. जीपीएस ट्रॅकिंग कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक शहर बस मोबाइलवर ‘लोकेट’ करता येणे शक्य आहे. आयुक्त, उपायुक्त आणि परिवहन अभियंता यांच्या मोबाइलवर शहर बसचे लोकेशन कळेल. कुठली बस कुठल्या मार्गावर धावत आहे, हे मोबाइलवर कळू लागल्याने अभिकर्त्याच्या अनियमिततेला चाप बसेल.
महिन्याअखेरीस सिस्टीम कार्यान्वित
शहरात धावणाºया बसेसला ‘इनबिल्ट ट्रॅकिंग सिस्टीम’ आहे. ते केवळ कार्यान्वित करणे गरजेचे आहे. त्या सिस्टीममध्ये केवळ ‘सिम’ टाकून अॅक्टिवेट झाल्यानंतर बसेसचे लोकेशन मोबाइलवर दिसू लागेल. त्यासाठी आम्ही पृथ्वी टूर्सशी व टाटा कन्सल्टंसीशी पत्रव्यवहार केला आहे. महिन्याअखेरीस ही यंत्रणा सुरू होणार असल्याची माहिती कार्यशाळा विभागाचे उपअभियंता स्वप्निल जसवंते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.