कचरागाड्यांना जीपीएस!
By Admin | Updated: November 2, 2016 00:15 IST2016-11-02T00:15:03+5:302016-11-02T00:15:03+5:30
शहरातील विविध वसाहतींमध्ये फिरुन कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांना महापालिका जीपीएस यंत्रणा बसविणार आहे.

कचरागाड्यांना जीपीएस!
नियंत्रण : पालिकेचा पुढाकार
अमरावती : शहरातील विविध वसाहतींमध्ये फिरुन कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांना महापालिका जीपीएस यंत्रणा बसविणार आहे. याशिवाय सुकळी कंपोस्ट डेपोमध्ये होणाऱ्या फेऱ्यांवर नियंत्रण ठेवल्या जाणार आहे. महापालिका क्षेत्रातून दिवसाकाठी २५० टन कचरा संकलित केल्या जातो. त्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारांची कामगार कार्यरत आहेत.
महापालिका क्षेत्रातील पाचही प्रशासकीय झोनमधील कचरा संकलित करून तो कचरा डंपर आणि ट्रकद्वारे सुकळी कंपोस्ट डेपोत नेवून टाकण्याचे कंत्राट पूजा कंस्ट्रक्शन वर्धाला मिळाले आहे. या कंत्राटावर गत आठवड्यातच स्थायीने मंजुरीचे शिक्कामोर्तब केले आहे. त्याचवेळी मंजुरी प्रदान करताना शहर स्वच्छ करावे आणि कुठलीही अनियमितता होवू नये यासाठी स्थायीने काही अटी/शर्ती समाविष्ठ केल्या आहेत. शहर ते सुकळी डेपोत रोज किती ट्रक वा डंपरने कचरा वहन केल्या जात आहे, ट्रक वा डंबरमध्ये किती प्रमाणात कचरा (वजन) आहे. हे जीपीएस यंत्रणेने साध्य होणार आहे. कंत्राटदारावर नियंत्रणासोबत संभाव्य गैरव्यवहाराला जीपीएस यंत्रणेमुळे चाप बसणार आहे. याशिवाय शहरात फिरून कचरा संकलन करणाऱ्या वाहनांना जीपीएस लागणार असल्याने या वाहनांचे शहरभराचे फिरणे नोंद होणार आहे. घंटागाडी वा कटले येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारीचेही निराकरणामुळे अधिक सोपे होणार आहे. दरम्यान कचरा संकलन व वाहतुकीच्या वाहनांना जीपीएस बसविण्याचे नियोजन असल्याने सर्वसामान्यांचा महापालिकेवरचा विश्वास वाढणार आहे. (प्रतिनिधी)
अशी राहणार
जीपीएस यंत्रणा
जीपीएस यंत्रणेमुळे पाहिजे त्यावेळी संबंधित वाहनाचे ठिकाण समजणार आहे. शिवाय संबंधित वाहन जागीच बंद ठेवणे वा सुरू करण्याची एसएमएस सुविधा यात अपेक्षित आहे. वाहन अपेक्षित ठिकाणी पोहचल्यावर एसएमएसद्वारे संबंधितांना सूचना मिळेल. संबंधित वाहनाचा प्रवास वेग, वाहन थांबलेले ठिकाण व वेळ याबाबतची माहिती सुद्धा संकलित केल्या जाते. या सुविधेद्वारे देण्यात आलेला निर्धारित वेग संबंधित वाहनाने पार केला तर त्याचीही सूचना संबंधितांना एसएमएसद्वारे मिळेल. यामुळे कचरा संकलनासाठी निघालेले वाहन कोठे गेले व तेथून कधी आले ही माहिती प्रशासनाजवळ राहणे शक्य होईल.