रेशन दुकानदारांना हवा शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा
By Admin | Updated: February 21, 2015 00:36 IST2015-02-21T00:36:20+5:302015-02-21T00:36:20+5:30
संपूर्ण राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारकांना शासकीय

रेशन दुकानदारांना हवा शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विविध समस्यांकडे वेधले शासनाचे लक्ष
अमरावती : संपूर्ण राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. यासह विविध मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघाचेवतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, स्वस्त धान्य दुकानदारांना तुटपुंजे कमिशन मिळत असल्याने त्याऐवजी दोन कुटुंबांचा उदरनिर्वाह होईल एवढे मानधन निश्चत करावे, केरोसीन परवाना धारकांना मिळत असलेले तुटपुंजे कमिशन वाढवून सर्व केरोसीन परवाना धारक व स्वस्त धान्य दुकानदारांना गॅसचे रिटेल आऊटलेट मंजूर करून गॅस वितरण करण्याबाबत नियुक्त करावे, राज्यात केरोसीनची केलेली कपात रद्द करून खुल्या बाजारातून केरोसीन विक्रीची परवानगी देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. आंदोलनानंतर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन दिले. सदर मागण्या शासनदरबारी पोहचविण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. आंदोलनस्थळी आ. वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी भेटी देऊन दुकानदारांच्या भावना जाणून घेतल्या. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश उल्हे, प्रकाश शेरेकर, मनोहर सुने, विजय देशमुख, साधुराम पाटील, प्रकाश गावंडे, नितीन उमाळे, बाळासाहेब हरणे, किशोर गुलालकरी, संजय शिदे, मनीषा इंगळे गणेश रॉय व अन्य दुकादारांचा समावेश होता. (प्रतिनिधी)