राज्यपालांचे कुपोषण निर्मूलन मिशन
By Admin | Updated: November 9, 2014 22:26 IST2014-11-09T22:26:51+5:302014-11-09T22:26:51+5:30
मेळघाटच्या कुप्रसिद्ध कुपोषणाचा कलंक पुसून काढण्यासाठी अंगणवाड्यांना सोई, सुविधांनी सज्ज करुन गरोदर मातांना अंडी, दूध मोफत दिले जाईल, अशी माहिती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी धारणी

राज्यपालांचे कुपोषण निर्मूलन मिशन
अमरावती : मेळघाटच्या कुप्रसिद्ध कुपोषणाचा कलंक पुसून काढण्यासाठी अंगणवाड्यांना सोई, सुविधांनी सज्ज करुन गरोदर मातांना अंडी, दूध मोफत दिले जाईल, अशी माहिती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी धारणी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यापुढे मेळघाटात 'कुपोषण निर्मूलन मिशन' राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धारणी येथील उपविभागीय कार्यालयात आदिवासींना वैयक्तिक लाभाच्या जमिनीचे पट्टे वाटप कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आदिवासींच्या हक्कावर कोणीही गदा आणू शकत नाही. कारण राज्य घटनेने आदिवासींना पाचव्या सूचीनुसार हक्क प्रदान केले असून हे हक्क अबाधित राहावे, यासाठी राज्यपालांना विशेषधिकार वापरण्याचा अधिकार बहाल केल्याचे राज्यपाल राव यांनी सांगितले. दरम्यान प्रशासनाने ठरविलेल्या गावांत दौरे न करता आडवळणाच्या गावांत जाऊन वस्तुस्थिती बघावी का, असा प्रश्न प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला असता राज्यपालांनी तो प्रयोगही पुढच्या वेळेस अवलंबविला जाईल, अशी खात्री दिली. स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही मेळघाटातील २५ गावांत वीज पोहचली नाही, या प्रश्नांवर बोलताना राज्यपालांनी मध्यप्रदेशातून वीज आणण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. त्याकरिता निधी उपलब्ध असून लवकरच मेळघाटतील काळोखात असलेली गावे प्रकाशमय होतील, अशी आशा व्यक्त केली. कुपोषणमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मान्य करीत गावातील अंगणवाड्यांना सर्व सोई, सुविधांनी सज्ज करण्यावर भर दिला जाईल.
गरोदर मातांना अंडी व दूध मोफत देण्याचे आदेश बजावले असून याची अंमलबजावणी त्वरेने केली जाईल, असे त्यांनी सांगितले. रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी स्थानिक आदिवासींना रोजगार मिळावा, यासाठी पर्यटनवाढीस प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.
पर्यटनांचा विकास झाला की, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील, असे राज्यपाल म्हणाले. कुपोषणावर अंकुश ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांचे सचिव रस्तोगी, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)