वैद्यकीय महाविद्यालयाबाबत शासन सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:36 IST2017-10-23T22:36:27+5:302017-10-23T22:36:41+5:30
अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्र स्थापन करण्याबाबत गांभीर्याने विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.

वैद्यकीय महाविद्यालयाबाबत शासन सकारात्मक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्र स्थापन करण्याबाबत गांभीर्याने विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आ. सुनील देशमुख, ना. रणजित पाटील, आ. अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे पदाधिकारी किरण पातुरकर उपस्थित होते. प्रारंभी कृती समिती पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. अमरावतीला इर्विन, डफरीन, सुपर स्पेशालिटी व टी.बी हॉस्पिटल अशी चार शासकीय रुग्णालये आहेत. येथे ५०० पेक्षा जास्त खाटा उपलब्ध आहेत. मेळघाटातील कुपोषण, शेतकरी आत्महत्या तसेच जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता, अमरावती येथे शासकीय महाविद्यालय स्थापन होणे आवश्यक आहे.
अमरावती शहरापासून सात किमी अंतरावर केंद्रीय विद्यापीठासाठी शासनाची जमीन उपलब्ध आहे. त्यातील शंभर एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्राला देता येईल. महाविद्यालयाच्या स्थापनेतून जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांची सेवा होईल. ग्रामीण व शहरी भागातून याबाबत मागणी असून, अनेक संघटनांनी यासाठी पाठिंबा दिला असल्याची माहिती कृती समितीचे संयोजक किरण पातुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, मनपा आयुक्त हेमंत पवार, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, पीडीएसीचे अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी उपस्थित होते.