न्याय मिळवून देण्यासाठी शासन तुमच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2016 00:13 IST2016-08-31T00:13:07+5:302016-08-31T00:13:07+5:30
भातकुली तालुक्यातील भालसी येथील रहिवासी व मुंबई येथील वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत महिला शिपाई माधुरी सोळंके हिची हत्या करण्यात आली.

न्याय मिळवून देण्यासाठी शासन तुमच्या पाठीशी
पालकमंत्री : माधुरी सोळंके परिवाराची सांत्वना
भातकुली : भातकुली तालुक्यातील भालसी येथील रहिवासी व मुंबई येथील वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत महिला शिपाई माधुरी सोळंके हिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष महात्मे यांनी सर्व पक्षीय मोर्चा काढला होता.
मोर्चाची दखल घेत पालकमंत्री प्रवीण पोटे तसेच जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी भालसी गांवी सोळंके परिवाराची भेट घेतली. स्व माधुरी हिच्या परिवाराला सांत्वना देत त्यांनी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. शनिवार २६ आॅगस्ट रोजी दिलेल्या भेटी दरम्यान पालकमंञी प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी स्वर्गीय माधुरी हिच्या हत्येबाबतच्या घटनाक्रमाची माहिती घेतली. माधुरीचे पिता, आई व बहिणीनी घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्याचे अश्रू आवरता आवरेना झाले होते.
पालकमंत्र्यानी मुंबई गृह खात्याच्या वरिष्ठांशी फोनद्वारे संपर्क साधून या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. स्व. माधुरी हिच्या भरवशावर परिवारातील इतर ७ जणांचा उदरनिर्वाह चालत होता. ही बाब लक्षात घेत सोळंके परिवारातील एका व्यक्तीला नोकरीत सामावून घ्यावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. सांत्वना भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे समवेत स्व. माधुरीचे पिता वासुदेव सोळंके, आई मंगला, बहीण रेश्मा, भाऊ युवराज, शिवराज सोळंके, आजोबा आजी, तहसीलदार वैशाली पाथरे, सरपंच रवी मातकर, राजु बोडखे, मदन साखरे, संजय मोहोड आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)