शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला मिळणार स्वायत्त संस्थेचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 13:31 IST2021-01-15T13:27:30+5:302021-01-15T13:31:13+5:30
Amravati News येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने ‘व्हीएमव्ही’ला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्याचे निश्चित केले आहे.

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला मिळणार स्वायत्त संस्थेचा दर्जा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने ‘व्हीएमव्ही’ला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्याचे निश्चित केले आहे. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाची सहा सदस्यीय चमू १५ व १६ जानेवारी रोजी असे दोन दिवस संस्थेचे परीक्षण करणार आहे.
गुजरात येथील सरदार पटेल विद्यापीठ वल्लभ विद्यानगर येथील कुलगुरू शिरीश कुलकर्णी हे परीक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. सदस्य दिल्ली विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख पारेख सिंह, जयपूर येथील प्राचार्य के.बी. शर्मा, विद्यापीठ नामीत सदस्य प्राचार्य के,के. देबनाथ, राज्य शासनाचे प्रतिनिधी उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे, समन्वयक अधिकारी म्हणून अनुराग हे असणार आहे.
ऑगस्ट १९२३ मध्ये स्थापन झालेली किंग एडवर्ड कॉलेज, त्यानंतर विदर्भ महाविद्यालय आणि सन २००८ पासून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था असा प्रवास आहे. ब्रिटिशकालीन वारसा लाभलेल्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला आता स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळणार असल्याने अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही बाब गौरवास्पद ठरणारी आहे. १५० प्राध्यापक, पाच हजार विद्यार्थी आणि २३ पदव्युत्तर विभागात संशोधन केंद्र असलेले हे राज्यातील एकमात्र शैक्षणिक संस्था आहे. यूजीसीद्धारा गठित चमुकडून या संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळण्यासाठी परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार संस्थेने जय्यत तयारी केली आहे. या चमूच्या परीक्षणानंतर ‘व्हीएमव्ही’ला सन २०२२-२३ पासून ‘एटॉनॉमस‘ दर्जा मिळेल, असे चित्र आहे.
भारतरत्न, पद्मश्रींचेही संस्थेत योगदान
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेने राजकीय, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा, सामाजिक व संशोधन क्षेत्रात ठसा उमटविणारी व्यक्ती घडविले आहे. वामन विष्णू मिरासी यांना संस्कृतमध्ये अतुलनीय कामगिरीबाबत भारतरत्न तर, वि.भा. कोलते यांना पद्मश्रीने गौरविले गेले आहे. मिरासी व काेलते या दोघांनीही ‘व्हीएमव्ही’चे प्राचार्य पद भूषविले आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हेसुद्धा याच संस्थेचे विद्यार्थी आहेत.