सरकारची पोलखोल
By Admin | Updated: October 29, 2015 00:34 IST2015-10-29T00:34:03+5:302015-10-29T00:34:03+5:30
राज्यात सतेवर येऊन कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर जनतेला ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवणाऱ्या भाजप सरकारमुळे जनतेला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सरकारची पोलखोल
राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल
आंदोलन : महागाईविरोधात जिल्हा कचेरीवर थाळीनाद
अमरावती : राज्यात सतेवर येऊन कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर जनतेला ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवणाऱ्या भाजप सरकारमुळे जनतेला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दुष्काळामुळे होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. भाजपा सरकारने कधी नव्हे एवढी महागाई सर्वसामान्य जनतेवर लादली आहे. त्यामुळे डाळीसह जीवनावश्यक वस्तुंचे दर कमी करूण स्वस्त दरात धान्य वितरण व्यवस्था सुरू करावी , आदी मागण्यांसाठी यासाठी बुधवारी राकाँद्वारे थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर हे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांना निवेदन देण्यात आले. केंद्र आणि राज्यात सत्तेत येताच गरीब, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लाऊन त्यांना महागाईच्या खाईत शासनाने लोटले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर जनतेचे आर्थिक बजेट महागाईमुळे कोलमडले आहे. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेले संकट फारच मोठे आहे, असे असताना सुध्दा भाजप शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस धोरण राबविले नाही. परिणामी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांवर असह्य ताण येत आहे. इंधनाचे भाव कमी झाले असले तरी जीवनावश्यक वस्तुंच्या भावावर फारसा फरक पडलेला नाही. केंद्र आणि राज्य सरकार यासर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपा शासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन केले. आंदोलनात आ. प्रकाश गजभिये, राकाँचे वसंत घुईखेडकर, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष राजेश शिरभाते, विनय कडू, गणेश रॉय, भास्कर ठाकरे, सुनील काळे, नितीन शेरेकर, निलिमा महल्ले, मेघा हरणे, सपना ठाकूर, वृषाली विघे, ऋषीकेश वैद्य, गजानन रेवाळकर, विनय कडू, सुशील गावंडे, प्रणव ओकटे, नंदु वऱ्हाडे, राजीक भाई,यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, पदाधिकारी, विविध आघाडयांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.