शासकीय भूखंड गेला चोरीला!

By Admin | Updated: October 24, 2015 00:01 IST2015-10-24T00:01:39+5:302015-10-24T00:01:39+5:30

‘कायद्याचं बोला’ या मराठी चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचा प्रसंग रंगविण्यात आला होता.

Government land went stolen! | शासकीय भूखंड गेला चोरीला!

शासकीय भूखंड गेला चोरीला!

७/१२ वर नोंद : प्रशासनाची शोधाशोध, जमीन दडपली कोणी?
प्रदीप भाकरे अमरावती
‘कायद्याचं बोला’ या मराठी चित्रपटात विहीर चोरीला गेल्याचा प्रसंग रंगविण्यात आला होता. ‘ती’ विहीर चोरीला गेल्याची तक्रार केली जाते आणि पुढे तिची शोधाशोध सुरू होते. शहरातील एका भूखंडाबाबत असाच काहीसा प्रकार घडल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.
७/१२ वर नोंद असलेला ०.३९ आर. क्षेत्रफळाचा भूखंड शासकीय मोजणीदरम्यान आढळूनच आला नाही. जिल्हा प्रशासनासह महसूल, नगररचना आणि भूमीअभिलेख कार्यालयाने पंधरवड्यापासून या भूखंडाची शोधमोहीम आरंभली आहे. ७/१२ वर नोंद असलेला ०.३९ आर. भूखंड गेला कुठे, याचे उत्तर कुणाचजवळ नाही. त्यामुळे मोजणी होऊनही त्या भूखंडाचा शोध लागत नसल्याने भूखंड चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी ‘बीएसएनएल’च्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याची तक्रार, त्यानंतर पोलीस बंदोबस्तात पाडलेले अतिक्रमण तथा उभय पक्षांकडून झालेल्या तक्रारीची पार्श्वभूमी या भूखंड चोरीप्रकरणाला आहे.
मौजा पेठ अमरावतीमधील गट क्र. ४९/२ या ४.४१ हेक्टर क्षेत्रातील ०.३९ आर भूखंड बेपत्ता आहे. बीएसएनएल (टेलिकॉम) आयुक्त, अमरावती विभाग, आयकर विभाग, मनोविकास स्पेशल चिल्ड्रेन एज्युकेशन सोसायटी आणि राणा एज्युकेशन सोसायटीला मंजूर भूखंड मोजून दिल्यावर त्याच अभिन्यासामधील ०.३९ आर भूखंड शिल्लक असावयास हवा होता. तथापि, शासकीय दस्तऐवज असलेल्या ७/१२ वर अस्तित्वात असलेला हा भूखंड प्रत्यक्षात दिसेनासा झाला आहे.
गाव नमुना ७ वर ‘ई-क्लास महाराष्ट्र शासन ०.३९’ अशी नोंद आहे. मात्र, मोजणी झाल्यानंतरही प्रत्यक्ष जागेवर ०.३९ आरचा खुला भूखंड तेथे उपलब्ध नाही.
असे झाले वाटप
२ फेब्रुवारी २००८ ला अभिन्यास मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी १४ फेब्रुवारी २००१ मध्ये ०.८१ आर भूखंड बीएसएनएलला, २१ डिसेंबर २००३ला १.२१ हेक्टर आयकर विभागाला, ०.१३ आर मनोविकास स्पेशल चिल्ड्रेन एज्युकेशन सोसायटीच्या नावे करण्यात आला. सन २०१० मध्ये श्री राणा एज्युकेशन सोसायटीला यातील २ हेक्टर जागा देण्यात आली आहे.

तक्रारीची पार्श्वभूमी
बीएसएनएलच्या जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. प्रत्यक्षात कमी जागा मिळाल्याची तक्रार संबंधितांकडून करण्यात आली. त्यानुसार मोजणी केल्यानंतर ७/१२ वर शिल्लक असणारी ०.३९ आर. जागा प्रत्यक्षात दिसत नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.

०.३९ आर. क्षेत्रफळाचा भूखंड असायलाच हवा. ती जागा शोधण्यासाठीच मोजणी करण्यात आली. त्यासंबंधीचा अहवाल २-३ दिवसांत प्राप्त होईलच. ०.३९ आर. जागेची नोंद ७/१२ वर आहे. चौकशी सुरू आहे. वस्तुस्थिती बाहेर येईलच.
- शंकर सिरसुध्दे,
उपजिल्हाधिकारी, महसूल.

जागेचा मेळ बसत नसल्यामुळेच राणा एज्युकेशन सोसायटीला अद्यापपर्यंत जागेचा ताबा देण्यात आलेला नाही. ई-क्लास जमिनीचे ले-आऊट पाडण्याचे अधिकार मनपाला नाहीत.
- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती.

Web Title: Government land went stolen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.