विकेंड निर्बंधाबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST2021-04-10T04:13:43+5:302021-04-10T04:13:43+5:30
अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत ‘ब्रेक द चेन’अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वीकेंडच्या दिवशीही खुली राहतील. तथापि, कुठल्याही व्यक्तीला आवश्यक ...

विकेंड निर्बंधाबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी
अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत ‘ब्रेक द चेन’अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वीकेंडच्या दिवशीही खुली राहतील. तथापि, कुठल्याही व्यक्तीला आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, असे राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांत नमूद आहे.
शनिवार, रविवार असे दोनही दिवशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत बाजार सुरू राहील. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेकडून तिथे पुरेशी प्रतिबंधक दक्षता घेतली जाते किंवा कसे, हे तपासणे आवश्यक आहे. याठिकाणी गर्दी होऊन साथीचा प्रसार होऊ शकतो, असे निदर्शनास येत असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेने तत्काळ राज्य शासनाची परवानगी घेऊन ते बंद करण्याचे सूचनांत नमूद आहे.
आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र, पारपत्र कार्यालय आदी एक खिडकी योजना कार्यालये सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत खुली असतील. उपाहारगृहांना स्वत:च्या वितरण व्यवस्थेमार्फत पार्सल सेवा पुरवता येईल. मात्र, ग्राहकाने तिथे येऊन पार्सल स्वीकारण्यास बंदी आहे.
वाहतूक, दुकाने, वितरण व्यवस्था व विविध परवानगी प्राप्त सेवांत कार्यरत व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली. त्यांना आरटीपीसीआर किंवा आता रॅपिड अँटिजेन चाचणीही करता येईल. हा नियम १० एप्रिलपासून लागू होईल.
--------------
ईलेक्ट्रिकल, मद्यविक्री दुकानांना ‘ब्रेक’
‘ब्रेक द चेन’अंतर्गत कठोर निर्बंधाना काही प्रमाणात शिथिल केले आहे. मात्र, शनिवार, रविवार या दोनही दिवशी बांधकाम, इलेक्ट्रिकल, मद्यविक्री दुकाने, टेलिकम्युनिकेशन साहित्याची दुकाने बंद राहतील, असे शासनाने आदेशात स्पष्ट केले आहे. ही दुकाने सुरू ठेवता येणार नाही. शासन आदेशाचे उल्लंघन झाल्यास पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्थांना कारवाई करावी, असे नमूद करण्यात आले आहे.