खोटी स्वप्ने दाखविणारे सरकार अपयशी
By Admin | Updated: July 30, 2016 00:10 IST2016-07-30T00:10:21+5:302016-07-30T00:10:21+5:30
दोन वर्षांपूर्वी खोटे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले केंद्र आणि राज्याचे सरकार अपयशी ठरले आहे.

खोटी स्वप्ने दाखविणारे सरकार अपयशी
काँग्रेसची बैठक : निवडून येण्याची पात्रता असणाऱ्यांनाच तिकीट, जिल्ह्यात राष्ट्रवादीशी युती नाही
परतवाडा : दोन वर्षांपूर्वी खोटे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले केंद्र आणि राज्याचे सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात शेतकरी भिकारी झाला असून आत्महत्या वाढल्या आहेत. दलित, बहुजन, अल्पसंख्याकांना शासनाने वेठीस धरल्याने शासनाप्रती जनाक्रोश वाढत आहे. तेव्हा येत्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर पुन्हा जोमाने काम करून सत्ता आणा. जिल्ह्यात राष्ट्रवादीसोबत कुठेच युती होणार नाही आणि जो निवडून येईल, त्यालाच उमेदवारी दिली जाईल. त्यामुळे गटातटाचे राजकारण बंद करून एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले.
गुरुवारी सायंकाळी अचलपूर-परतवाडा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक तथा वर्धेचे माजी नगरसेवक शेखर शेंडे, माजी आ. केवलराम काळे, हरिशंकरजी अग्रवाल, नियाजभाई, हरिदासजी नाथे, डी. पी. राऊत, मो. गणीभाई, साजीद फुलारी, प्रकाश वैद्य, राजेंद्र गोरले, अजीज खान, जहीरभाई, बंडू वासनकर, गौरव काळे, पुरुषोत्तम बोरेकार, हरिश्चंद्र मुगल, राजाभाऊ चित्रकार, कैलास आवारे, इकबाल पटेल, प्रशांत देशमुख, जी. एम. खान, श्रीकांत झोडपे, सागर व्यास, अमोल बोरेकार, किसन दहीकर, वैशाली कडू, सविता बरमा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
उमेदवार निवडीसाठी समिती
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत योग्य उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी जिल्हाभर समित्या नियुक्त करण्यात यईल. काँग्रेसचे उमेदवार लवकरच जाहीर करण्यावर भर राहील, निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थानीय स्वराज्य संस्था निवडणुकीत कुठल्याच प्रकारची युती केली जाणार नसल्याचे मेळाव्यात स्पष्ट करण्यात आले.
निवडणुका पुढे आहेत. संगठन शक्ती मजबूत करण्याची गरज आहे. मागील दोन वर्षात सामान्य कार्यकर्त्यांना वरिष्ठ स्तरावर न्याय मिळाला नाही. जिल्ह्यात स्थानीय स्वराज्य संस्थांवर काँग्रेसची सत्ता आहे. ती पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केवलराम काळे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
नगराध्यक्षपदासाठी दोन वर्षांनंतर घोडेबाजार
काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रपरिषद घेण्यात आली. त्यामध्ये नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून दिल्यानंतर दोन वर्षांनंतर अविश्वासाची टांगती तलवार पाहता घोडेबाजार होणार आहे. त्यामुळे अविश्वाससुद्धा जनतेतून घेण्याचे मत बबलू देशमुख यांनी मांडले. गटबाजी होणार नाही, यावर लक्ष दिले जाईल, तर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समितींची कामे मोठ्या प्रमाणात दिसत असताना आमदारांची कामे कुठे गेली, असा टोला त्यांनी लगावला. पत्रपरिषदेला निरीक्षक शेखर शेंडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार केवलराम काळे, हरिशंकर अग्रवाल उपस्थित होते.
‘ताई’ गेल्या, गटातटाचा विषय संपला
अचलपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण होते. ‘वसुधाताई’ आणि ‘बबलूभाऊ’ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. आता ताई राष्ट्रवादीत गेल्याने सर्व विषय संपला आहे. स्थानीय स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रातील निवडणुकांवर लक्ष केंद्रित करीत जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन करा, असा सल्ला बबलू देशमुख यांनी दिला.
नेतृत्व सक्षम करा
दोन वर्षांपूर्वी एक लाट आली होती. स्थानीय उमेदवार न बघता मतदारांनी केवळ एका माणसाला मते दिली. मात्र त्यांची खोटी आश्वासने जनतेपुढे उघडी पडली आहे. तेव्हा येत्या निवडणुकीत पक्षनेतृत्व स्वीकारा, पक्षाची ताकद आपली ताकद असल्याचे मत अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक शेखर शेंडे यांनी मांडले. ते अध्यक्षपदावरुन बोलत होते.