शासन उदासीन, साझांची संख्यावाढ रखडली
By Admin | Updated: March 31, 2017 00:20 IST2017-03-31T00:20:30+5:302017-03-31T00:20:30+5:30
वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार व वारंवार सोपविली जाणारी कामे यामुळे तलाठ्यांवर कामांचा बोजा वाढला आहे.

शासन उदासीन, साझांची संख्यावाढ रखडली
तलाठ्यांवर ताण : लोकसंख्येच्या प्रमाणात ४० साझा वाढणार
अमरावती : वाढती लोकसंख्या, वाढते शेतकरी खातेदार व वारंवार सोपविली जाणारी कामे यामुळे तलाठ्यांवर कामांचा बोजा वाढला आहे. त्यामुळे तलाठी साझांची संख्या वाढविण्याचा निर्णय सन २०१४ मध्ये घेण्यात आला. यामध्ये जिल्ह्यात ४० साझा वाढणार आहेत.
यासंदर्भात शिफारस समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने मान्य केला. मात्र अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन न झाल्यामुळे गेल्या वर्षापासून प्रस्ताव बासनात पडला आहे. तीन दशकांत लोकसंख्या कित्येकपटीने वाढली. मात्र तलाठी साझांची संख्या तेवढीच राहिली. तलाठ्यांवर मोठ्या प्रमाणात कामांचा बोजा वाढल्याने तलाठी सज्जांची संख्यावाढ करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय आयुक्त सदस्य असणारी समिती गठित करण्यात आली. या समितीने सादर केलेला अहवाल वर्षभऱ्यापूर्वी सादर झाला व मंत्रिमंडळाने त्या शिफारसींना मान्यता दिली व अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे याविषयी आग्रही होते. मात्र त्यांच्यानंतर हा विषय तूर्तास बासनात गुंडाळला गेला आहे.
राज्यातील सहा महसूल विभागांत ३६ जिल्हे, १८४ उपविभाग, ३५८ तालुके, २०९३ मंडळ अधिकारी व १२ हजार ३२७ तलाठी सज्जे आहेत. जिल्ह्यात ४०० तलाठी साझे आहेत व वाढत्या शेतकरी खातेदारांच्या १० प्रकरणांत म्हणजेच जिल्ह्यात नव्याने ४० तलाठी साझे वाढणार आहे. यामुळे तलाठ्यांवर ताण कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र यासाठी शासनस्तर पाठपुरावा होणे महत्त्वाचे आहे.
१९८३ मध्ये झाली होती
तलाठी सज्जांची निर्मिती
राज्यातील तलाठी सज्ज निर्मितीचे निकष ठरविण्यासाठी १९७४ मध्ये कपूर समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसीनुसार १९८३ मध्ये तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली. सद्यस्थितीत राज्यात १२ हजार ३२७ तलाठी सज्जे आहेत. मात्र वाढता कामाचा बोजा असल्यामुळे सज्जांची वाढ करण्याची मागणी तलाठी संघटनेद्वारा होत असल्याने सज्जांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय सरकारने २०१४ मध्ये घेतला. (प्रतिनिधी)