आपदग्रस्तांना विनाविलंब मदतीसाठी शासन निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:12 IST2021-07-26T04:12:42+5:302021-07-26T04:12:42+5:30
अमरावती : नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या, मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत ...

आपदग्रस्तांना विनाविलंब मदतीसाठी शासन निर्णय
अमरावती : नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या, मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत रक्कम कोषागारातून उणे प्राधिकारपत्रावर काढण्यास आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आपद्ग्रस्तांना विनाविलंब मदत मिळणार आहे, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी सांगितले.
पालकमंत्री ठाकूर यांनी गत आठवड्यात अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून नुकसानग्रस्त कुटुंबांनाही सांत्वनपर भेटी दिल्या व दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त कुटुंबांना तत्काळ साह्य मिळवून देणे आवश्यक असते. मात्र, अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत पंचनामे व प्रस्ताव प्राप्त होऊन बाधितांना मदत वितरित करण्यात बराच कालावधी जातो. अशावेळी तातडीने मदत करणे शक्य व्हावे, प्रक्रियेत बदल करण्यासंबंधी पालकमंत्र्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीत बाधित होणाऱ्या, मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांना, तसेच त्यांच्या वारसांना तातडीने मदत वाटप करणे शक्य व्हावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना उणे प्राधिकारपत्रावर कोषागारातून रक्कम काढण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्ती अचानक उद्भवते. त्याचा अंदाज बांधणे कठीण असते. अशावेळी बाधितांना तातडीने मदत मिळणे गरजेचे असते. पंचनामे, प्रस्ताव आदी प्रक्रियेत काही निश्चित कालावधी द्यावाच लागतो. त्यामुळे बाधित, मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या वारसांना मदत मिळण्यात विलंब होऊ नये यासाठी उणे प्राधिकारपत्रावर रक्कम काढण्यास परवानगी देणारा निर्णय शासनाने घेतला. यामुळे बाधितांना तत्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील बाधित, मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांना या निर्णयानुसार तत्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.