शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध
By Admin | Updated: September 19, 2016 00:20 IST2016-09-19T00:20:28+5:302016-09-19T00:20:28+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या सहाय्याने सिंचनाकरिता पाणी उपलब्ध व्हावे, ...

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध
पालकमंत्री : महावितरणच्या कामाचा आढावा
अमरावती : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या सहाय्याने सिंचनाकरिता पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता महावितरण विभागाने वीजजोडणी कृषी फिडरवरून गावठान फिडरवर शिफ्ट करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महावितरण विभागाच्या प्रस्तावित प्रकल्प व नव्याने उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्रांचा आढावा शनिवारी पालकमंत्र्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, महावितरणचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रस्तावित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनांतर्गत मंजूर प्रकल्प, प्रस्तावित उपकेंद्रे, उपकेंद्रांची क्षमता वाढ, उपकेंद्रातील वाढीव रोहीत्र, एकात्मिक ऊर्जा विकास योजनांतर्गत नवीन उपकेंद्रे व उपकेंद्रांची क्षमता वाढ, जिल्हाधिकारी अमरावती यांच्याव्दारे जमीन मंजूर केलेल्या प्रस्तावित गावनिहाय उपकेंद्रांची यादी याविषयी सविस्तर माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता महावितरण विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना ना.पोटे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्यात. बैठकीनंतर जिल्ह्यातील विभागाशी संबंधित तक्रारकर्त्यांची गाऱ्हाणी व निवेदने पालकमंत्री पोटे यांनी स्वीकारली. तक्रारकर्त्यांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. (प्रतिनिधी)