सरकारवर समाजाचा दबाव आवश्यक : सरसंघचालक मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 10:13 IST2022-04-28T18:48:45+5:302022-04-29T10:13:46+5:30
अमरावती शहरानजीकच्या भानखेडा मार्गालगत साकारण्यात आलेल्या संत कंवरधाम येथे संत कंवरराम यांचे पणतू साई राजेशलाल मोरडीया यांच्या ऐतिहासीक गद्दीनशीनी समारोह ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते.

सरकारवर समाजाचा दबाव आवश्यक : सरसंघचालक मोहन भागवत
अमरावती : सरकारच्या नावातच ‘स’ म्हणजेच सकारात्मकता आणि ‘रकार’ म्हणजे सरकार सत्ता असेपर्यंत सरकार राज्य करेल, मात्र समाज एकत्र असेल आणि समाजाचा दबाव असेल तर सरकारला त्या गोष्टी करणे बंधनकारक असतात. मग ते सरकार कोणतेही असो. सरकारला समाजाच्या सोबत राहावे लागते आणि समाज ठरवेल तोपर्यंत सरकार राहू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी अमरावती येथे केले.
अमरावती शहरानजीकच्या भानखेडा मार्गालगत साकारण्यात आलेल्या संत कंवरधाम येथे संत कंवरराम यांचे पणतू साई राजेशलाल मोरडीया यांच्या ऐतिहासीक गद्दीनशीनी समारोह ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. आज सर्व काही झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे आता संपूर्ण समाजाने सुद्धा एकत्र येऊन चांगला विचार करणे गरजेचे आहे. समाजाने वाईट विचार केला तर त्यातून गुंडागर्दी निर्माण होऊ शकते, वाईट गोष्टी घडतात म्हणून सर्वांचे मन चांगले बनावे, अशी मनिषा त्यांनी व्यक्त केली.
मी तर सरकारमध्ये जात नाही, एकच गोष्ट सरकारने मला दिली, ती म्हणजे सुरक्षा. बस एवढेच माझ्याजवळ सरकारचे आहे, मी समाजाचा आहे, त्यामुळे मी सरकारमध्ये जात नाही, पण आपण सरकारमध्ये असलो तर चांगलं काम करू शकतो, मला इच्छा नसताना सुरक्षा मिळाली, प्राजंळ मत भागवत यांनी मांडले.
यावेळी मंचावर चार प्रमुख धामचे प्रमुख ब्रदिकाश्रमाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज (प्रयागराज), अंजनगाव सुर्जी येथील देवानथ मठाचे मठाधीश पूज्य जितेंद्रनाथ महाराज, साई राजेशलाल मोरडीया, लखनौ येथील संत बाबा चांडूराम, शदाणी दरबार रायपूर येथील पीठाधिश्वर साई युधिष्ठिरलाल, कांचन राय, नानक आहुजा, ईश्वरीदेवी, लप्पीसेठ जाजोदिया आदी उपस्थित होते.
देशात सिंधी युर्निव्हसिटी व्हावी
सिंधी समाजाची मातृभूमि भारत आहे. त्यामुळे सरकारने देशात सिंधी युर्निव्हसिटी करावी. यापुढे संताच्या सुरक्षेचे काम करावे लागेल. आपले हक्क, अधिकार, मागण्यासाठी सरकारला बाध्य करावे, असे भागवत म्हणाले.