अवैध व्यवसायांमुळे गणोरीवासी त्रस्त
By Admin | Updated: February 11, 2015 00:21 IST2015-02-11T00:21:07+5:302015-02-11T00:21:07+5:30
भातकुली तालुक्यातील सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गाव असणाऱ्या गणोरी येथे गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्याला ऊत आला ...

अवैध व्यवसायांमुळे गणोरीवासी त्रस्त
गणोरी : भातकुली तालुक्यातील सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गाव असणाऱ्या गणोरी येथे गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्याला ऊत आला असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
गणोरी हे गाव हिंदू-मुस्लीम नागरिकांच्या एकोप्याचे प्रतीक असून या ठिकाणी धार्मिक उत्सव सर्वधर्मीय लोक मोठ्या आनंदाने साजरा करतात आजपर्यंत या गावात हिंदू-मुस्लीम एकोप्याला गालबोट लागले नाही. परंतु गत काही महिन्यांपासून गावात वरलीमटका, देशी दारुचा अवैध पुरवठा व गावात सुरू असलेला धंदा सोबतच होत असलेला जुगार यामुळे परिसरातील शांतता भंग पावत आहे. याचा त्रास गावकऱ्यांना होत आहे.
गावात दिवसाढवळ्या देशी दारूचा पुरवठा होतो. दारूचा माल कुरूमवरून बहाद्दरपूर मार्गे गणोरी व आसपासच्या गावात वितरित होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गावातील अवैध व्यावसायिकांशी पोलिसांचे सलोख्याचे संबंध असल्याचे चित्र काही दिवसांपूर्वीच गावातील लोकांच्या नजरेत पडले. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. तेव्हा सी. पी. साहेब या प्रकरणात लक्ष घालून गणोरी वासियांना या त्रासापासून मुक्त करावे अशी विनंती ग्रामवासी करीत आहे. वर्धा, गडचिरोली पाठोपाठ चंद्रपुरातही दारुबंदी कायदा लागू झाला आता अमरावतीतही व्हावा अशी गणोरी व परिसरातील नागरिकांची इच्छा आहे. त्यासाठी गणोरी व परिसरातील नागरिक पालकमंत्र्यांना एक निवेदन देण्याच्या तयारीत सुद्धा आहे. (वार्ताहर)