अनधिकृत मोबाईल मनोऱ्यांवर पडणार गाज
By Admin | Updated: January 25, 2015 23:05 IST2015-01-25T23:05:12+5:302015-01-25T23:05:12+5:30
महापालिका हद्दीत नियमांना छेद देऊन उभारण्यात आलेले १२८ मोबाईल मनोरे हटविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार रविवारी बडनेऱ्यातील जनक रेसिडेन्सीत उभारण्यात

अनधिकृत मोबाईल मनोऱ्यांवर पडणार गाज
अमरावती : महापालिका हद्दीत नियमांना छेद देऊन उभारण्यात आलेले १२८ मोबाईल मनोरे हटविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार रविवारी बडनेऱ्यातील जनक रेसिडेन्सीत उभारण्यात आलेला अनधिकृत मोबाईल मनोरा हटविण्याची कारवाई सुरू झाली. मात्र, क्रेन उशिरा पोहचल्याने वेळेअभावी ही कारवाई उद्यावर ढकलण्यात आली. या गंभीर प्रश्नावरुन जनविकास- रिपाइंचे गटनेते प्रकाश बनसोड यांनी आमसभेत प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली होती, हे विशेष.
न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने ४ मार्च २०१४ रोजी मोबाईल मनोऱ्यांची उभारणी करताना नवीन नियमावली लागू केली आहे. या नियमांना अधीन राहूनच मोबाईल मनोऱ्यांची उभारणी करणे अपेक्षित होते. मात्र मोबाईल कंपन्यांनी नियम गुंडाळून मनोरे उभारले आहेत.
मनोऱ्यांवर निरंतर कारवाई
शहरातील गल्लीबोळात उभारण्यात आलेल्या मनोऱ्यांमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता काही सुजाण लोकप्रतिनिधींनी याविरुद्ध आवाज उठविला. दरम्यान मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ज्या घरांवर मनोरे उभारले आहेत, त्या मालकांनी या लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र फारसे यश मिळाले नाही.
अखेर आयुक्त अरुण डोंगरे यांनी अनधिकृत मोबाईल मनोरे काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवार सुटीच्या दिवशीही महापालिकेचे अभियंता दीपक खडेकार, मंगेश वाटाणे, हेमंत महाजन, अजय विंचुरकर, शामकांत टोपरे, घनशाम वाघाडे, सुधीर गोटे, योगेश पिठे यांच्या मार्गदर्शनात बडनेऱ्यातील अनधिकृत मोबाईल मनोरा हटविण्यासाठी पोहोचले. मात्र हा मनोरा फार उंच उभारण्यात आला असल्याने कोणताही अपघात किंवा अप्रिय घटना होऊ नये, यासाठी नागपूर येथून मोठी क्रेन मागविण्यात आली आहे. या क्रेनचा दोन दिवसाचा खर्च दोन लाख रुपये असल्याची माहिती उपअभियंता दीपक खडेकार यांनी दिली. शहरात अनिधकृत मोबाईल मनोऱ्यांची समस्या गंभीर असून आयुक्तांच्या आदेशानुसार ते हटविण्याची कारवाई सुरुच राहील, अशी माहिती आहे. नागपूरहून मोबाईल मनोरे हटविण्यासाठी बोलविण्यात आलेल्या क्रेनला अमरावतीत पोहोचण्यासाठी १५ तास लागले, हे विशेष! (प्रतिनिधी)