पोलिस ठाण्याच्या मागेच सुरू होता गोरखधंदा; घरपोच विक्रीचा फंडा
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 20, 2023 15:53 IST2023-08-20T15:53:00+5:302023-08-20T15:53:15+5:30
माहुली जहांगीर पोलिस स्टेशनच्या मागील कंपाउंडला लागून असलेल्या शिवारात करोडोंच्या अनधिकृत खतांचा गोरखधंदा सुरू होता.

पोलिस ठाण्याच्या मागेच सुरू होता गोरखधंदा; घरपोच विक्रीचा फंडा
अमरावती : माहुली जहांगीर पोलिस स्टेशनच्या मागील कंपाउंडला लागून असलेल्या शिवारात करोडोंच्या अनधिकृत खतांचा गोरखधंदा सुरू होता. याची भनकही पोलिसांना लागू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या गोदामातून खतांची वाहतूक करताना ट्रकच्या आतमध्ये खतांची पोती व त्यासमोर सागवान रोपांचे क्रेट लावण्यात येत असल्याने खरा व्यवसाय दुर्लक्षित झाल्याची परिसरात चर्चा आहे.
माहुली जहागीर येथील गोदामातून २.३९ कोटींच्या अनधिकृत खताचा साठा कृषी व पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईतून जप्त करण्यात आल्यानंतर दोन्ही विभाग अलर्ट झाले आहेत. कृषी विभागाद्वारा कृषी केंद्रांच्या नियमित तपासण्या सुरूच राहतात.
याशिवाय रेकार्डवर नसलेल्या काही संशयास्पद गोदामाची माहिती घेऊन तपासणीच्या सूचना पथकाला देण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त पोलिस विभागानेही चार पथकांद्वारे तपास आरंभला आहे.