'हेल्थ क्लब'च्या नावावर गोरखधंदा
By Admin | Updated: April 7, 2016 00:04 IST2016-04-07T00:04:36+5:302016-04-07T00:04:36+5:30
येथील विवेकानंद कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका हेल्थ क्लबमध्ये आरोग्य सुधारणेच्या नावावर सामान्यजनांची राजरोसपणे दिशाभूल केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

'हेल्थ क्लब'च्या नावावर गोरखधंदा
पावत्या नाही : प्रति शेक १८० रुपये, आहारतज्ज्ञांचा अभाव
अमरावती : येथील विवेकानंद कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका हेल्थ क्लबमध्ये आरोग्य सुधारणेच्या नावावर सामान्यजनांची राजरोसपणे दिशाभूल केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
या हेल्थ क्लबमध्ये महागडे पोषक पेय (न्युट्रीशन शेक) सर्व्ह केले जाते; तथापि अनेकांना या पोषक पेयांचे क्लबचालकांनी सांगितल्यानुसार निश्चित कालावधीत रिझल्टस् मिळत नाहीत. पेय घेणाऱ्यांनी यासंबंधाने चर्चा केल्यास, दोष पेयसेवनासाठी मोठी रक्कम खर्च करणाऱ्यांच्या दिनचर्येला देऊन क्लबचे सदस्य मोकळे होतात.
या क्लबची संलग्नता असलेल्या एका अमेरिकन कंपनीची अत्यंत महागडी उत्पादने बोलविण्यासाठी मधूर संभाषणाचा वापर क्लब सदस्यांद्वारे केला जातो. उत्पादन बोलवेपर्यंत क्लबमधील प्रत्येक सदस्य ग्राहकाशी गोड बोलण्याचा कटाक्ष पाळतो. एकदा का उत्पादने बोलविलीत की, क्लबसदस्य ग्राहकांना दुर्लक्षित करतात. वेळप्रसंगी सेवा नाकारतात, क्लबबाहेर जाण्यासही सांगतात. अशा क्लबचा शहरात सुळसुळाट होत आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाने असल्या क्लबची वैधता तपासणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)
अप्रशिक्षित सदस्य
या क्लबमध्ये एकाच मुद्यावर वेगवेगळे सदस्य वेगवेगळे सल्ले देतात. शरीराला आवश्यक असणारे घटक जसे प्रोटिन्स, कार्बोहायड्रेड, व्हिटामिन्स किती प्रमाणात घ्यावेत, याविषयी अभावानेच एकवाक्यता आढळते. कुणाच्या शरीराला कुठला घटक किती प्रमाणात आवश्यक आहे, हे सांगण्यासाठी संबंधित विषयाचे तज्ज्ञ असणे आवश्यक आहे; सदर क्लबमध्ये याविषयीचा सल्ला देणारी, प्रमाण ठरवून देणारी मंडळी आहार विषयातील तज्ज्ञ असण्याचा कुठलाही शैक्षणिक पुरावा त्यांच्याकडे नाही.
आजार बरे करण्याचे दावे
न्यूट्रीशन पेय घेल्यामुळे कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार, लिव्हर सिरोसिस, किडनी डिसॉर्डर यासारखे दुर्धर आजार बघता-बघता छुमंतर होतात, असा प्रचार या क्लबमधील सदस्यांद्वारे नियमितपणे केला जातो. त्यासाठी अनेकांची तोंडी उदाहरणेही दिली जातात. क्लबमध्ये १८० रुपयांना एक शेक मिळतो. ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या या रकमेच्या पावत्या दिल्या जात नाहीत.