गोपालनगर : दारुबंदीसाठी जिल्हाधिकारी 'पॉझिटिव्ह'
By Admin | Updated: February 27, 2015 00:20 IST2015-02-27T00:20:49+5:302015-02-27T00:20:49+5:30
स्थानिक वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करण्याच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर शहरात इतरही वादग्रस्त दारु विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

गोपालनगर : दारुबंदीसाठी जिल्हाधिकारी 'पॉझिटिव्ह'
अमरावती : स्थानिक वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान हद्दपार करण्याच्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर शहरात इतरही वादग्रस्त दारु विक्रीचे दुकान बंद करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. याच श्रृखंलेत गोपालनगर परिसरातील मायानगर येथे असलेल्या देशी दारु विक्री दुकानाबाबतचा अहवाल पाठवण्यिाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
तीन दिवसांपूर्वी मायानगरातील आंदोलक महिलांनी जिल्हा कचेरी गाठून देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी जोरकसपणे मांडली. यावेळी महिला इमारतीवर चढल्यात. पोलीस आणि आंदोलकांमध्ये तू,तू- मै-मै झाली. परंतु जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून या दारु दुकानांबाबत वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे कळविले आहे. त्यानुसार एक्साईजने आंदोलक संजय गव्हाळे, संजय घरडे, जनार्दन बंड, उमेश शिरसे यांना पत्र पाठवून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कळविले आहे. मायानगरातील देशी दारु विक्रीचे दुकान बंद करण्याची नियमावली आहे. या नियमावलीच्या अधीन राहूनच प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचे एक्साईजच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वॉर्डातील २५ टक्के महिलांचा आक्षेप असल्यास तसा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत महिलांचा सहाभाग आवश्यक असून ‘बाटली आडवी की उभी’ त्यानंतरच दारुबंदीचा निर्णय घेतला जाईल, असे या पत्रात नमूद आहे. प्रारंभी एक्साईजचे अधिकारी मायानगर परिसराचे निरीक्षण करुन या दारु दुकानाबाबत वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. जनभावनेचा आदर ठेवूनच दारु विक्रीच्या दुकानासंदर्भात गुप्त अहवाल कळवावा लागणार असल्याने एक्साईजचे अधिकारी कामाला लागले आहेत. हे दारु विक्रीचे दुकान गोपालनगर ते एमआयडीसी मार्गावर असून परिसरात लोकवस्ती, आजुबाजुला असलेले धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय आदींची चाचपणी केली जाणार आहे. शांतता नांदावी, यासाठी हे दारु विक्रीचे दुकान बंद करणे आवश्यक आहे किंवा नाही, याची खातरजमा एक्साईजच्या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. मायानगरातील महिलांनी आंदोलन सुरु केल्यानंतर पहिला टप्पा प्रशासनाने हाती घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया या टप्प्यातील महत्त्वाचा दुवा असून निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग किती? यावरच देशी दारु विक्रीच्या दुकानाचे भवितव्य ठरेल, हे वास्तव आहे.