अवघ्या १२ तासात पकडला २९ लाखांचा माल

By Admin | Updated: September 23, 2015 00:13 IST2015-09-23T00:13:35+5:302015-09-23T00:13:35+5:30

नांदगाव खंडेश्वर ठाण्यांतर्गत मंगरुळ चव्हाळानजीक २० सप्टेंबरच्या रात्री ट्रक चालकाला झाडाला बांधून ट्रकमधील दारूसह ट्रक पळवून नेला होता.

The goods of 29 lakhs caught in just 12 hours | अवघ्या १२ तासात पकडला २९ लाखांचा माल

अवघ्या १२ तासात पकडला २९ लाखांचा माल

सहा आरोपी गजाआड : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती : नांदगाव खंडेश्वर ठाण्यांतर्गत मंगरुळ चव्हाळानजीक २० सप्टेंबरच्या रात्री ट्रक चालकाला झाडाला बांधून ट्रकमधील दारूसह ट्रक पळवून नेला होता. मात्र, गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या बारा तासांत आरोपींसह मुद्देमालाचा शोध लावला आहे. याप्रकरणातील नागपूर आणि अमरावतीच्या सहा आरोपींना अटक करण्यात आली असून या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यामुळे ट्रक लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होण्याचे संकेत आहेत.
नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील मंगरुळ चव्हाळा ते सालोड मार्गावर कोपरगाव येथून नागपूरकडे १७ लाख रूपयांची दारू घेऊन जाणारा ट्रक पी.जे.-०४ जे.- ५३६९, हा २० सप्टेंबरच्या मध्यरात्री सालोड शिवारात येताच ट्रकचा पाठलाग करणारे टेम्पो क्रुझर हे चार चाकी वाहन ट्रकला आडवे झाले. ट्रक चालक शेख इब्राहिम (३५, रा. नागपूर) याने प्रसंगावधान राखून ट्रक थांबविला. परंतु लगेच चारचाकीतील तीन आरोपींनी ट्रकचा ताबा घेतला. ट्रकला दोन-तीन कि.मी. पुढे नेले आणि चालकाला रस्त्यालगतच्या पळसाच्या झाडाला दोरीने बांधून ठेवले व आरोपी ट्रक घेऊन पसार झाले. पहाटेपर्यंत ट्रकचालक झाडाला बांधलेल्या अवस्थेत होता. दिवस उजाडल्यानंतर त्याने आरडाओरडा केला असता गावातील काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. लगेच नांदगाव खंडेश्वर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा ट्रक कोपरगावहून नागपूरच्या दिशेने दारू घेऊन निघाला होता. ट्रकमध्ये नागपूर निवासी जेसवाणी यांच्या मालकीची सुमारे १७ लाख रूपयांची दारू होती. आरोपी सोनू पठाण (२१, नागपूर), बादल ठाकूर (२०, नागपूर), अक्षय खलगे (२०, नागपूर), पवन बेलोरकर (२१, नागपूर), अब्दुल शहजाद (२३, अमरावती), गजानन डिके (५०, अमरावती) यांनी चारचाकीतून या ट्रकचा पाठलाग केला. या सिनेमास्टाईल प्रकारणाचा मुख्य सूत्रधार गजानन डिके हा होता. ट्रक पळविल्यानंतर त्यातील दारुची आणि ट्रकची विल्हेवाट अमरावतीमध्ये लावली जाणार होती. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रयत्नांमुळे दारूसह ट्रक आणि पाठलाग करणारे चारचाकी वाहन व आरोपींना अटक करण्यात यश आले.

स्थानिक गुन्हे शाखेला नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी मदत केली. त्यामुळेच एवढा मोठा गुन्हा उघडकीस आला आहे.
- शैलेश शेळके
ठाणेदार
पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर.

Web Title: The goods of 29 lakhs caught in just 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.