दारू पकडायला गेले, सापडले वन्यजीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:00 IST2018-03-09T00:00:04+5:302018-03-09T00:00:04+5:30
तालुक्यातील दहिगाव रेचा येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याच्या माहितीवरून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने राजकुमार वामनराव थोरात याच्या घरी धाड टाकली. यावेळी अवैध दारूऐवजी त्याच्या घरून वन्यजीव जप्त करण्यात आले.

दारू पकडायला गेले, सापडले वन्यजीव!
आॅनलाईन लोकमत
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील दहिगाव रेचा येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याच्या माहितीवरून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने राजकुमार वामनराव थोरात याच्या घरी धाड टाकली. यावेळी अवैध दारूऐवजी त्याच्या घरून वन्यजीव जप्त करण्यात आले.
दहिगाव येथे राजकुमार थोरात हा त्यांच्या घरातून अवैध देशी दारूविक्री करीत असल्याची माहिती परीविक्षाधीन अधिकारी समीर शेख यांना मिळाली. त्यांनी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकासह ६ मार्चला सायंकाळी त्याच्या घरी धाड टाकली असता, देशी दारूऐवजी ससा, पाणकोंबडी, कासव असे वन्यजीव आढळून आलेत.
पोलीस पथकाने तातडीने वनविभागाच्या मोबाइल स्कॉडशी संपर्क केला. आरएफओ महेश धंदर, जी. बी. आमले, एस.बी. बरवट यांच्या ताब्यात वन्यजीव देण्यात आले. दहिगाव रेचा हे परतवाडा आरएफओ अंतर्गत येत असल्याने तेथे ७ मार्चला वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा तपास आरएफओ एस. पी. बारखडे करीत आहेत. आरोपी राजकुमार वामनराव थोरात फरार असल्याचे सांगण्यात आले.