मृग बहराच्या संत्र्याला सोन्याचा भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 14:38 IST2021-02-27T14:38:25+5:302021-02-27T14:38:44+5:30
Amravati News सततची नापिकी, प्रतिकूल वातावरणामुळे पिकांवर झालेला किडींचा प्रादुर्भाव व शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असताना, मृग बहराच्या संत्र्याला सोन्याचा भाव मिळत आहे.

मृग बहराच्या संत्र्याला सोन्याचा भाव !
सतीश बहुरूपी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सततची नापिकी, प्रतिकूल वातावरणामुळे पिकांवर झालेला किडींचा प्रादुर्भाव व शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असताना, मृग बहराच्या संत्र्याला सोन्याचे भाव मिळत आहेत. त्यामुळे वर्षभराच्या कष्टाचे चीज झाल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे.
सोयाबीनचे पीक यावर्षी विविध किडींमुळे उद्ध्वस्त झाले. कापसाच्या पिकातही ५० टक्के घट झाली. खरीप पिके दगा देत असताना वरूड तालुक्याची मदार संत्र्यावर, बागायती शेतीवर. मात्र, 'ड्राय झोन’चा कलंकही पाचवीला पुजलेला. अशातच राजुरा बाजार येथील एका शेतकऱ्याला मृग बहराच्या संत्र्याने आशेचा किरण दाखविला. राजुरा येथील प्रदीप भोंडे या तरुण शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित वडाळा शिवारात जेमतेम तीन एकर शेती त्यात दीड एकर शेतीत संत्राझाडे लागवड केली. स्रोत जेमतेम असताना, कमी पाण्यात तळहातावरील फोडाप्रमाणे कशीबशी ही झाडे जगविली.
मृग बहर हा १०० टक्के निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असतो. मृग नक्षत्र वेळेवर आल्याने यावर्षी संत्री चांगलीच लदबदली. राजुरा येथील संत्राउत्पादक प्रदीप भोंडे यांनी अनुभवी शेतकरी व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात संत्र्याची जोपासना केली. मेहनतीने उत्तम प्रत तयार झाली व अचानक दक्षिण भारतात नागपुरी आंबट-गोड चवीच्या लज्जतदार संत्र्याची अनेकांना भुरळ पाडल्याने मागणी वाढली. त्यांच्या बागेतील संत्र्याची फळे दर्जेदार असल्याने संत्रा व्यापाऱ्यांकडून चांगला भावही मिळाला. एकूण खोडवा १५० संत्रा झाडांपैकी १२० संत्रा झाडावरील २४ टन माल निघाला. तो ८.५० लाख रुपयांत विकला गेला. परिसरात नव्हे तर तालुक्यात भोंडे यांच्या संत्राबागेचीच शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
संत्राबागेतून निव्वळ फळे मिळवून जमत नाही. संत्र्याची प्रतवारी ही तितकीच महत्त्वाची आहे. व्यापारी चांगल्या मालालाच भाव देतो म्हणजे रंग, रूप, आकार, चव ह्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यावा लागतात. यावर्षी मेहनतीला फळ आले.
प्रदीप भोंडे, संत्रा उत्पादक, राजुरा बाजार
-----------