नांदगाव पेठ : पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ५० वर्षीय महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन अज्ञात दुचाकीस्वारांनी उडविल्याची घटना मंगळवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान शेगाव-रहाटगाव मार्गावरील एस्सार पेट्रोल पंपनजीक घडली. घटनेनंतर दुचाकीस्वार चोरटे रिंग रोड मार्गाने पसार झाले.
विद्या विश्वासराव गडलिंग (रा. जानकीनगर) या नेहमीप्रमाणे रहाटगाव मार्गावर मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या. सकाळी ६ च्या सुमारास मागून आलेल्या भरधाव दुचाकीस्वारांपैकी मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमची सोन्याची चेन ओढून तेथून पोबारा केला. महिलेने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत दुचाकीवर आलेले तिघेही रिंगरोड मार्गाने कठोरा चौकाकडे पळून गेले. नांदगाव पेठ पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर ठाणेदार अनिल कुरळकर यांनी लगेच कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. यावेळी भाग-१ चे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहायक आयुक्त डुमरे, सहायक पोलीस निरीक्षक दत्ता देसाई घटनास्थळी उपस्थित होते. नांदगाव पेठ पोलिसांनी दुचाकीस्वारांविरुद्ध भादंविचे कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल नोंदविला.