बाजारपेठेत जाताय; मोबाईल सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:50+5:302021-07-08T04:10:50+5:30

अमरावती : बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या वरच्या खिशातून मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसात हरविलेल्या मोबाईलबाबतच्या दररोज ...

Goes to market; Handle mobile | बाजारपेठेत जाताय; मोबाईल सांभाळा

बाजारपेठेत जाताय; मोबाईल सांभाळा

अमरावती : बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या वरच्या खिशातून मोबाईल चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसात हरविलेल्या मोबाईलबाबतच्या दररोज सरासरी डझनभर तक्रारी प्राप्त होतात. पोलिसांनाही मोबाईल शोधण्यास अडचणी येतात. मात्र, पोलिसांकडून अनेक मोबाईलचा शोध घेतला गेला असून, संबंधित नागरिकांना हरविलेले मोबाईल देण्यात आले. मात्र, नागरिकांनी बाजारपेठेत आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना सावधान राहण्याची गरज आहे.

शहरासह जिल्ह्यात मोबाईल चोरल्याच्या आणि हरविल्याच्या अनेक घटना घडत आहेत. याबाबत संबंधित व्यक्ती पोलीस अधीक्षक व आयुक्तालयातील सायबर सेलकडे तक्रारी करतात. काही जण ऑनलाईन पद्धतीनेदेखील तक्रारी करतात. या तक्रारींची पोलिसांकडून दखल घेण्यात येते. संबंधित मोबाईलचा आयएमईआय क्रमांक ट्रेस केला जातो. जर मोबाईल सुरू असेल तर मोबाईल मिळण्यास अडचण येत नाही. मात्र, मोबाईल बंद राहिल्यास त्या मोबाईलचा शोध घेण्यास अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बॉक्स

टक्के मोबाईलचा तपासच लागत नाही

पोलिसांना हरविलेल्या किंवा चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेताना अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. एखाद्याने मोबाईल बंद करून ठेवला असेल तर त्या मोबाईलचा शोध घेताना मोठा त्रास होतो. कारण बंद मोबाईल ट्रेस होत नसल्याने पोलिसांची चांगलीच डोकेदुखी होते. बंद मोबाईल जर तीन किंवा चार महिन्याने तसेच वर्ष, दोन वर्षांनी जरी सुरू केला, तरी पोलिसांकडून लगेच तो मोबाईल ट्रेस करून त्याचा शोध घेतला जातो.

बॉक्स

या ठिकाणी सांभाळा मोबाईल

शहराती इतवारा बाजार, शुक्रवार बाजारासह ग्रामीण भागातील बाजारपेठेत जाताना नागरिकांनी आपला मोबाईल सांभाळून ठेवण्याची गरज आहे. बसमध्ये प्रवास करताना तसेच बसस्थानकावर गर्दी असल्यास चोरटे याचा फायदा घेत मोबाईल लंपास करीत असल्याचे अनेकदा दिसून आले. जत्रा, मिरवणुका, राजकीय सभा, लग्नसोहळे आदी ठिकाणांवरूनही अनेकांचे महागडे मोबाईल चोरून नेल्याच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.

बॉक्स

मोबाईल शोधण्यास पोलिसांना यश

मोबाईल मिसिंगच्या तक्रारी पोलीस ठाण्यात प्राप्त होतात. या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलीस धडपड करीत असतात. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, उपायुक्त विक्रम साळी, पोलीस निरीक्षक सिमा दाताळकर यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलच्या टीमला हरविलेले मोबाईल शोधण्यास यश आले आहे. हरविलेल्या किंवा चोरी गेलेल्या मोबाईलचा शोध घेत मोबाईल हस्तगत केले आहे.

बॉक्स

मोबाईल चोरी जाताच तातडीने हे करा

मोबाईल हरविला असेल किंवा चोरी गेला असेल तर सरकारने सीईआयआर (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी सिस्टीम) सुरू केले आहे. यामुळे तुमचा हरविलेला मोबाईल ट्रेस करता येतो. आयएमईआय नंबर रजिस्टर करून तो ट्रॅक करणे शक्य होते. फक्त मोबाईल ट्रॅक करता येतो. एवढेच नाही तर सीम कार्डही ब्लॉक करु शकता. मोबाईल चोरणाऱ्याने दुसरे सीम कार्ड त्यात घातले तर त्याची माहिती पोलिसांना आणि तुम्हालादेखील कळते. त्यामुळे मोबाईल परत देणे किंवा त्याचा वापर न करता तसाच टाकून देणे, हाच पर्याय त्यांच्याकडे उरतो.

कोट

मोबाईल हरविल्याच्या किंवा चोरी गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होताच सायबर सेलकडून मोबाईलचा आयएमईआय क्रमांक ट्रेस करण्याचे काम सुरू होते. इतकेच नव्हे तर सीमकार्ड आणि मोबाईलदेखील ब्लॉक करण्याचे काम सायबर टीम करते. अनेकांचे मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले असून, हरविलेले किंवा चोरी गेलेल्या मोबाईलचे शोधकार्य युद्धस्तरावर सुरू आहे.

- सीमा दाताळकर,

पोलीस निरीक्षक, सायबर सेल

शहर आयुक्तालय

Web Title: Goes to market; Handle mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.