धामणगावच्या गोविंदांची गगनभरारी!
By Admin | Updated: September 5, 2015 00:19 IST2015-09-05T00:19:35+5:302015-09-05T00:19:35+5:30
‘गोविंदा आला रे आला..’ च्या गजरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडी स्पर्धा साजऱ्या होतील.

धामणगावच्या गोविंदांची गगनभरारी!
जल्लोष : गाजविल्या १५० पेक्षा अधिक दहीहंडी स्पर्धा
धामणगाव रेल्वे : ‘गोविंदा आला रे आला..’ च्या गजरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडी स्पर्धा साजऱ्या होतील. यातच धामणगाव रेल्वेसारख्या निमशहरी भागात सतत सराव चिकाटी व प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर जिल्ह्याच्या अनेक ठिकाणांवरून बक्षिसे मिळवून स्वत:च्या प्रयत्नावर आदर्श ग्रुपने शरीर सौष्ठवसारख्या स्पर्धेपासून ते दहीहंडी पथकापर्यंतची वाटचाल सुरू केली व विदर्भात लौकिक मिळविला आहे.
समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा, या उद्देशाने शहरातील शिवचरण लसवंते या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने १० वर्षांपूर्वीपासून संस्कारित मुलांची एक फळी निर्माण केली़ युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता स्वत: सुदृढ शरीर बनवावे, या उद्देशाने आदर्श व्यायामशाळेत सर्वांनी एकत्र येऊन मुलांना घडविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातून शरीर सौष्ठव स्पर्धेत यश मिळविणारे आदर्श सदस्यसुदधा निर्माण झाले. यामध्ये स्वत: शिवचरण लसवंते, अजय मारवे, अंकुश ठाकरे, मनोज भुजबळ, राहुल राऊत, नीलेश आवारे, सागर शेंद्रे, शेैलेश वानखडे यांचा समावेश आहे.
या संघटनेने अमरावती शहरातील राजकमल चौकात आयोजित दहीहंडी स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. परतवाडा येथील दहीहंडीचे प्रथम बक्षीस सलग या संघटनेने पटकावले. यानंतर विदर्भातील विविध जिल्ह्यातील दहीहंडी स्पर्धाही या संघटनेच्या गोविंदांनी पटकावल्या. कुटुंबातील आर्थिक परिस्थिती चांगली नसताना गोविंदा पथकाला मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतून या तरूणांनी ‘आदर्श कॅटरिंग सर्व्हिस’ सुरू केली. त्यातून अर्थार्जन सुरू केले.
त्यांनी ढोलताशे, पथक, रक्तदान शिबिरे, महापुरूषाच्या जयंत्या-पुण्यतिथ्यांचे उत्सव यासारखे समाजोेपयोगी कार्यक्रम राबविले़ इतकेच नव्हे तर ‘आदर्श’च्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतसुध्दा दिली जाते. या मंडळाने सध्याच्या तरूणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जिद्द चिकाटी आणि महत्त्वाकांक्षेच्या बळावर या मंडळाच्या तरूणांनी यश संपादन केले आहे.