शासकीय योजनांचा लाभ द्या
By Admin | Updated: October 27, 2015 00:22 IST2015-10-27T00:22:59+5:302015-10-27T00:22:59+5:30
महाराजस्व अभियान २०१५ अंतर्गत विस्तारित समाधान योजना शिबिराचे आयोजन प्रत्येक तालुका व मंडळ स्तरावर करण्यात येत आहे.

शासकीय योजनांचा लाभ द्या
महाराजस्व अभियान : पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे प्रतिपादन
अमरावती : महाराजस्व अभियान २०१५ अंतर्गत विस्तारित समाधान योजना शिबिराचे आयोजन प्रत्येक तालुका व मंडळ स्तरावर करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ समाजातील प्रत्येकाला करून द्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज केले.
महाराजस्व अभियान २०१५ जिल्हास्तरीय अंमलबजावणी या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन नियोजन भवनात पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किरण गित्ते होते. अपर जिल्हाधिकारी कुशलसिंह परदेशी,आरडीसी मोहन पातुरकर, रामदास सिध्दभट्टी, सिरसुध्दे, उपविभागीय अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, प्रवीण ठाकरे, रणवीर, इब्राहीम चौधरी तसेच तहसीलदार सुरेश बगळे आदी उपस्थित होते.
पोटे म्हणाले की, शासकीय यंत्रणेमध्ये कुठलीही शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषिसेवक अशी त्रिमूर्ती कार्यरत असते. राष्ट्राच्या व राज्याच्या विकासामध्ये गावांचा विकास प्रामुख्याने अतिशय महत्वाचा घटक असतो. गावांचा विकास होऊन समृध्द झाली तरच तरच तो देश प्रगत देश म्हणून गणला जातो. त्यामुळे शासकीय यंत्रणेतील गाव पातळीवरच्या प्रशासकीय कर्मचाऱ्याने आपल्या कर्तव्याची जाण ठेवून प्रामाणिकपणे गावातील प्रत्येकाला विविध कल्याणकारी योजनांची माहिती व लाभ द्यावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
विभागात लाचलुचपतची प्रकरणे ही सर्वात जास्त महसूल विभागातील आहेत. एकूण ३३पैकी २४ प्रकरणे ही एकट्या महसूल विभागाची आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असले पाहीजे यासाठी आपल्या पगारात भागवा ही संकल्पना जिल्हाधिकाऱ्यांनी पुरस्कृत केली आहे. अनीतीचा पैसा हा कधीही नीती घेऊन जातो. भ्रष्टाचारी मनुष्याला समाज कधीही माफ करत नाही. त्यामुळे सर्व अधिकाऱ््यांनी अशा अपप्रवृत्तीचा त्याग करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
जिल्हाधिकारी किरण गित्ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, महसूल प्रशासन अधिक गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शक होण्याच्या हेतुने महाराजस्व अभियान राज्यात १ आॅगस्टपासून सुरु करण्यात आले आहे. गाव पातळीवरील महसूल अधिकारी हा तलाठी असतो. तलाठयांनी विकासाच्या सर्व योजना शासन निर्णयापुरतेच मयार्दीत न ठेवता या योजनांचा लाभ शेवटच्या माणसांपर्यंत कसा पोहचविता येईल, यासाठी प्रयत्न करावे. तलाठी पदाचा जुना इतिहास सांगताना ते म्हणाले की, तलाठी हे पद शेरशाह नुरीच्या सन १५५० कार्यकाळापासून अमलात असून ४५० वर्षांपूर्वीचा त्याला इतिहास आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर शिरसुध्दे यांनी केले. कार्यशाळेला सर्व महसूल अधिकारी कर्मचारी, नायब तहसीलदार, तलाठी उपस्थित होते.