रबी पिकांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रूपये मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 00:31 IST2016-03-11T00:31:21+5:302016-03-11T00:31:21+5:30
अवकाळी पावसाच्या सततचा आगमनामुळे व वादळामुळे तसेच गारांमुळे हरभरा , गहू, भाजीपाला पिके तसेच संत्रा, पपई, निंबू आदींचे तालुक्यासह

रबी पिकांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रूपये मदत द्या
जनता दलाची मागणी : वादळी पाऊस, गारपीटमुळे शेतीपिकांचे नुकसान
चांदूररेल्वे : अवकाळी पावसाच्या सततचा आगमनामुळे व वादळामुळे तसेच गारांमुळे हरभरा , गहू, भाजीपाला पिके तसेच संत्रा, पपई, निंबू आदींचे तालुक्यासह उपविभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे रबी पिकांसाठी हेक्टरी १५ हजार रुपये व फळांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने देण्याची मागणी जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग ढोले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी, चांदूररेल्वे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केले आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा हे पीक मातीमोल झाले. संत्रा बागेत संत्रा फळांचा सडा पडला असून आंबीया बहार गळल्याने बागायतदारांचे दुहेरी नुकसान झाले. तालुक्यातील हरभरा, गहू, भाजीपाला व अन्य पिके शेतकऱ्यांचा हातून निसटली आहेत. कारण हरभरा सोंगणीसाठी आला असताना व गहू हिरवा असतानाच अशा प्रकारचे वादळ व पावसामुळे गहू पूर्ण खाली पडला आहे. तालुक्यासह उपविभागात फळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी गारपिटीचा मोठा फटका कारला गावाला बसला असून आमला विश्वेश्वर, टेंभुर्णी, अमदोरी, पाथरगाव, थुगाव, सावंगी मग्रापुर, धनापुर, मांडवा गाव वादळी पाऊस व गारपिटीतून सुटले नाही. चांदूररेल्वे येथील उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे व तहसीलदार दिनेश बढिये यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि पंचनामे सुरू झाले आहे.
त्यामुळे शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रबी पिकांसाठी हेक्टरी १५ हजार रुपए व फळांसाठी हेक्टरी २५ हजार रुपए मदत तातडीने देण्याची मागणी जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग ढोले यांच्यासह जनता दलाचे चांदूररेल्वे तालुकाध्यक्ष धनराज वरघट, नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष राजु राउत, धामणगाव रेल्वे तालुकाध्यक्ष विनोद गोठाने, अंबादास हरणे, साहेबराव पाटील , सोनोने, दादाराव डोंगरे, सुधीर सव्वालाखे, विलास हेरोडे, अवधुत सोनवणे आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)