मुलींच्या हक्कावरून अजिंक्य-ललितमध्ये संघर्ष!

By Admin | Updated: December 29, 2014 00:18 IST2014-12-29T00:18:24+5:302014-12-29T00:18:24+5:30

निराधार, निराश्रित अज्ञान मुला-मुलींच्या निकोप आणि कायदेसंगत देखभालीसाठी असलेल्या तपोवनातील बालगृहात मुलींवर हक्क गाजविण्याच्या मुद्यावरून ...

Girls' rights struggle in Ajinkya-Lalit! | मुलींच्या हक्कावरून अजिंक्य-ललितमध्ये संघर्ष!

मुलींच्या हक्कावरून अजिंक्य-ललितमध्ये संघर्ष!

गणेश देशमुख अमरावती
निराधार, निराश्रित अज्ञान मुला-मुलींच्या निकोप आणि कायदेसंगत देखभालीसाठी असलेल्या तपोवनातील बालगृहात मुलींवर हक्क गाजविण्याच्या मुद्यावरून दोन गटांमध्ये वरचेवर खटके उडत होते, अशी धक्कादायक माहिती 'लोकमत'च्या शोधमोहिमेत उघड झाली आहे.
विदर्भ महारोगी सेवा संस्थेचा पदावनत सचिव श्रीराम गोसावी याचा पुण्यात शिकणारा मुलगा अजिंक्य आणि गांधी जिल्हा म्हणून आदरभाव असलेल्या वर्धेतून मुलीच्या मागावर अंबापुरीत आलेला ललित अग्निहोत्री हे दोन तरुण दोन्ही गटांचे म्होरके होते.
बालगृह ज्या संस्थेंतर्गत चालविले जाते त्या संस्थेचे सचिवपद वडिलांकडेच असल्यामुळे अजिंक्यला बालगृह परिसरात सहज प्रवेश मिळू शकला. वडिलांच्या मूक संमतीचा लाभ घेऊन त्याचा बालगृहातही खुला वावर सुरू झाला होता. पालकांविना असलेल्या बालगृहातील मुली आपलीच मालमत्ता असावी, अशा अविर्भावात अजिंक्यचे वागणे सुरू झाले. मुलींना म्हणूनच शरीरसुखाची मागणी करताना त्याची जिव्हा थरथरत नव्हती. अजिंक्यचे हे व्यसन इतके खालावले की, बालगृहातील प्रत्येकच मुलगी माझ्या कह््यात असावी, हे वेडच जणू त्याच्या डोक्यात शिरले होते. प्रत्येकीवरच तो नजर टाकायचा. त्याच्या नापाक इराद्यांना धुडकावून लावणाऱ्या रणरागिणी आता बोलू लागल्या आहेत.
ललित अग्निहोेत्री या तरुणालाही तपोवनात, बालगृहात सहज प्रवेश उपलब्ध होता. निलंबित अधीक्षक गजानन चुटे याचे त्याला बळ होते. बालगृहातील लोक ललितला नावानेही ओळखतात, यावरून त्याचा बालगृहातील वावर लक्षात यावा. बालगृहाच्या नियमांची अंमलबजावणी ज्यांच्या शिरावर होती त्यांनीच ललितला समर्थन दिल्यामुळे ललित निर्ढावला होेता. 'माझे कुणीच काही बिघडवू शकत नाही' या वृत्तीने तोदेखील बालगृहातील मुलीवर हक्क गाजवायचा. ललित ज्या मुलीवर स्वामित्त्व दाखवायचा त्या मुलीवर आणि तिच्या सख्यांवर अजिंक्यने नजर ठेवू नये, असा अट्टहास ललितचा होता; तथापि, वर्चस्वाच्या या लढाईत जेतेपद सिद्ध करण्यासाठी अजिंक्य ललितच्या गटातील मुलींवरही 'ट्राय' करायचा. याच कारणावरून दोघांमध्ये अनेक खटके उडाले आहेत.
ज्यांचे मातृपितृ छत्र हिरावले गेले, ज्यांना समाजाच्या जिव्हाळ्याची गरज आहे, त्या मुलींची कुणी दोन टारगट मुले आपसात हिस्सेवाटणी काय करतात? त्या मुलींच्या मालकीवरून भांडणे काय करतात?
अनामिकांच्या न्यायासाठी सर्वांचीच हवी तत्परता!
दाजीसाहेबांच्या त्यागतेजाने पुनित तपोवनातील मंडळी त्यांना साथ काय देतात? संवेदना असणाऱ्या कुणाचेही रक्त उकळावे असेच हे सारे सहजपणे घडत आले आहे. त्या निराश्रित अज्ञान मुलींची काळजी वाहण्याची जबाबदारी स्वीकारलेले महिला व बालविकास खाते, बालकल्याण समिती, संचालक, जिल्हाधिकारी, तपोवनातील पदाधिकारी यापैकी कुणीच हे रोखू शकले नाही.
मायेची फुंकर हवी असलेल्या समाजातील दुर्दैवी मुलींना प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि विश्वास देणे हे अवघ्या समाजाचेच कर्तव्य ठरते. प्रशासकीय अधिकारी वेतन, काही संस्था त्यापोटी मानधन घेत असल्यामुळे त्यांचे ते आद्य कर्तव्य ठरते, इतकेच.
सामाजिक स्वास्थ्याचे ध्येय बाळगून स्थापन झालेल्या समाजसेवी संस्था आणि लोककल्याणासाठीच आयुष्य वाहत असलेल्या लोकप्रतिनिधींचीही ही नैतिक जबाबदारी ठरते.
निराश्रीत मुलींवर हक्क सांगण्यासाठी दोन टारगट तरुणांची तपोवनात नियमितपणे होत आलेली भांडणे अवघ्या समाजासाठीच लाजीरवाणी ठरणारी आहेत.
अजिंक्यला पोलिसांनी जेरबंद केले. तथापि, महिला व बालविकास विभाग आणि जिल्हाधिकारी यांची पोलिसांसमान तत्परता दिसून येत नाही. 'चौकशी सुरू आहे, सत्य बाहेर येईलच,' ही वापरून वापरून गुळगुळीत झालेलीच उत्तरे याप्रकरणीही जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलीत.
'बालकल्याण समितीला आम्ही बाध्य आहोत,' असे सांगून महिला व बालविकास विभागाला एखादवेळी हात वर करताही येतील. तथापि, या प्रकरणाबाबत न्याय झाला, असा संकेत बाल कल्याण समितीला समाजात पोहोचवावाच लागेल.
'केअर अ‍ॅन्ड प्रोटक्शन अ‍ॅक्ट' पायदळी तुडविणाऱ्या, बाल कल्याण समितीचाही मुलाहिजा न ठेवणाऱ्या ललित अग्निहोत्री या टारगट तरुणाला बाल कल्याण समितीने आज पाठीशी घातले तर उद्या बालगृहात नियमबाह्यरीत्या मनमर्जीप्रमाणे वावरणाऱ्या धेंडांवर रोख लावायचा कुणी?
वाह, मेकला साहब !
तपोवनातील बालगृहात अनेक वर्षांपासून साचून असलेल्या घाणीचा उपसा करण्याच्या श्रेष्ठ कार्याचे श्रेय पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांना द्यावे लागेल. तपोवनातील प्रकरणाची संवेदनशील मनाने दखल घेऊन त्यांनी स्वत:हून चौकशी आरंभली. पोलीस चौकशीत गंभीर मुद्दे पुढे येत गेलेत. हा किळसवाणा प्रकार निखंदून काढण्याचा जणू त्यांनी संकल्पच सोडला असावा, अशा पद्धतीने त्यांचे यासंबंधाने कार्य सुरू आहे. पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, डीसीपी सोमनाथ घार्गे, सहायक आयुक्त एस.एन.तडवी आणि त्यांच्या चमुने पोटतिडकीने व वेगाने या प्रकरणाची मुळे उघडी करणे सुरू केल्यामुळेच गुन्हेगारांवर आणि गुन्ह्यांवर पांघरूण घालायला कुणालाच जागा मिळाली नाही. पोलिसांच्या तपासाची गती आणि तपासकार्यातील कर्तव्यकठोरपणा असाच कायम रहावा, ही लोकभावना आहे. सर्व दोषींना शासन मिळवून देणे हाच उद्ध्वस्त मुलींना समर्पक न्याय ठरेल.

Web Title: Girls' rights struggle in Ajinkya-Lalit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.