पाणीटंचाई निवारणार्थ जलदगतीने कामे करा
By Admin | Updated: February 28, 2016 00:39 IST2016-02-28T00:39:45+5:302016-02-28T00:39:45+5:30
पाणीटंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने जलदगतीने उपाययोजना करण्यासोबत स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, खचलेल्या विहिरींचे बांधकाम, आरोग्य, इत्यादी कामे तातडीने पूर्ण करण्यात यावे, ...

पाणीटंचाई निवारणार्थ जलदगतीने कामे करा
सूचना : यशोमती ठाकूर यांच्या उपाययोजना
तिवसा : पाणीटंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने जलदगतीने उपाययोजना करण्यासोबत स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, खचलेल्या विहिरींचे बांधकाम, आरोग्य, इत्यादी कामे तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना आ. यशोमती ठाकूर यांनी अमरावती पंचायत समितीच्या गुरुवारी पार पडलेल्या मासिक सभेत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या, अनेक योजनांसाठी निधी असला तरी त्या अपूर्ण राहतात, असा आजवरचा अनुभव आहे. माहुली जहागीर, नांदुरा व पिंगळाई येथील पाणीपुरवठा योजनेच्या टाकीचे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असताना योजनांची कामे रखडतात कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खचलेल्या विहिरींचे बांधकाम करण्याकरिता निधीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचा मुद्दाही त्यांनी सभेत उपस्थित केला. आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्यात. शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांकरिता तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. सभेला अमरावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद कापडे, सदस्य, अधिकारी, सरपंच उपस्थित होते.