बडनेरा : शहराची लोकसंख्या लक्षात घेता, लसीकरणाचा पुरवठा वाढविण्यात यावा. त्याचप्रमाणे मोदी दवाखान्याला लागूनच असलेल्या ट्रामा केअर इमारतीत लसीकरण सुरू करावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे नगरसेवकांनी केली.
नगरसेवक प्रकाश बनसोड व ललित झंझाड यांनी सोमवारी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना एका निवेदनातून बडनेरा शहरासाठी लसीकरणाचा पुरवठा वाढविण्यात यावा, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे १ मे पासून लस टोचून घेणाऱ्यांची संख्या बरीच वाढणार आहे. वयोवृद्ध इतरही वयोगटातील लस टोचून घेणाऱ्यांच्या सोयीसाठी ट्रामा केअर इमारतीत लसीकरण केंद्र सुरू केल्यास सर्वांच्याच सोयीचे ठरेल. उन्हात या बिल्डिंगमध्ये नागरिकांना बसण्याची चांगली व्यवस्था होऊ शकते तसेच पहिला व दुसरा डोस अशा दोन टेबलवर व्यवस्था करण्यात यावी. ट्रामा केअर येथील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून लसीकरणाच्या कामात सामावून घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.