विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांमध्ये जुंपली
By Admin | Updated: May 11, 2014 22:52 IST2014-05-11T22:52:35+5:302014-05-11T22:52:35+5:30
तुकड्या वाचविण्यासाठी शिक्षकांनी डोक्याला दुपट्टे बांधून उन्हात पालकांच्या भेटी घेणे सुरु केले आहे. शेंदूरजनाघाट येथील दोन खासगी शाळांचे शिक्षक एकाच ...

विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांमध्ये जुंपली
शेंदूरजनाघाट : तुकड्या वाचविण्यासाठी शिक्षकांनी डोक्याला दुपट्टे बांधून उन्हात पालकांच्या भेटी घेणे सुरु केले आहे. शेंदूरजनाघाट येथील दोन खासगी शाळांचे शिक्षक एकाच पालकाच्या घरी एकाचवेळी गेल्याने दोघांची भंबेरी उडाली. पालकांसमोर दोन्ही शाळांच्या शिक्षकांची चांगलीच बाचाबाची झाली. एकमेकांना ओढाताण करण्यापर्यंत प्रकरण पोहोचले. अखेर पालकाच्या मध्यस्थीने वाद निवळला. शिक्षणाच्या बाजारीकरणात विद्यार्थी भरकटला जाण्याची शक्यता आहे. ‘नोकरी टिकवायची असेल तर तुकड्या वाचवा’ असा फतवा शिक्षणसम्राटांनी काढला आहे. लाखो रुपये देऊन शिक्षकांनी नोकरी मिळविली. संस्था चालकांपुढे नतमस्तक होऊन नोकरी पत्करली. तीन वर्षे फुकट गेली तरीसुध्दा नशिबी निराशाच आली, अशी अवस्था तालुक्यातील खासगी आणि शासकीय शाळांतील शिक्षकांची झाली आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणाचा फटका शिक्षकांसह पालकांनाही बसला आहे. तालुक्यात १५८ पेक्षा अधिक शाळा, महाविद्यालये आहेत. कॉन्व्हेंटमध्ये तर सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे. व्यापारीकरणासाठी शिक्षण क्षेत्र पोषक असल्याने आता मोेठ्या लोकांनी हात टाकून ई-स्कूलची संकल्पना राबवून पालकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न चालविले आहे. नुकताच निकाल लागल्यानंतर खांद्यावर दुपट्टा टाकून खेडोपाडी भटकंती करुन विद्यार्थी मिळविण्याचा शिक्षकांचा प्रयत्न सुरु आहे. विद्यार्थ्यांसाठी पालकांची मनधरणी सुरु आहे. त्यांना आर्थिक प्रलोभने देऊन विद्यार्थी मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एवढेच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांनीसुध्दा वरुड तालुक्यात आपला मोर्चा वळविला. तालुक्यातील शाळा चालकांनी सळो की पळो करुन सोडले आहे. आपल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी दलालांना पाचारण करुन विद्यार्थ्यामागे ५०० रुपये देऊन विद्यार्थ्याचा प्रवेश मिळविण्याचा गोरखधंदा सुरु आहे. केवळ नोकरी म्हणून सेवा देणार्यांच्या शाळेत विद्यार्थी संख्या रोडावत असल्याने अनेक शाळांतील तुकड्या बंद पडण्याचा संभाव्य धोका पाहता तुकडी टिकविण्यासाठी वाटेल ते करा परंतु विद्यार्थी आणा, असा फतवाच शिक्षणसम्राटांनी काढला आहे. यामुळे नोकरी टिकवायची तर शाळा टिकवा, असे आवाहन संस्थाचालकांनी नवख्या शिक्षकांना केले आहे. इयत्ता पाचवी व सातवीत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी भटकंती करुन विद्यार्थी मिळविण्याचे फर्माण काढण्यात आले. यामुळे ग्रामीण भागात भटकंती करुन विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक वणवण भटकंती करताना दिसत आहेत. यासाठी ग्रामीण भागात विद्यार्थ्यामागे ५०० रुपयेसुध्दा देऊन विद्यार्थी मिळविण्याचे प्रयत्न असल्याने तालुक्यातील विद्यार्थी नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांकडून पळविले जातात. यामुळे तालुक्यातील शिक्षक हवालदिल झाले आहेत. पाहिजे त्याला बाटली ही पद्धतही सुरु करुन प्रवेशास बाध्य करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. स्वत:ची नोकरी टिकवायची असल्याने ४४ अंश सेल्सिअस तापमानात जीवाचे रान करुन शहरातील शिक्षक खेड्यापाड्याने दुपारी, रात्री बेरात्री वाटेल तेव्हा फिरताना दिसत आहेत. डोक्याला दुपट्टे बांधून ग्रामीण भागाचे दौरे करुन पालकांची मनधरणी सुरु झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शिक्षक घाबरुन विद्यार्थी मिळविण्यासाठी जीवाचे रानं करीत आहे. ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या पाल्याला शहरी भागातील इंग्रजी शाळेत टाकण्याचे स्वप्न मनी बाळगल्याने ग्रामीण भागातील शाळा आता ओस पडू लागल्या आहेत. (वार्ताहर )