शंकर महाराजांना अटक करा

By Admin | Updated: August 29, 2016 23:58 IST2016-08-29T23:58:57+5:302016-08-29T23:58:57+5:30

पिंपळखुटा येथील संत शंकर महाराजांच्या आश्रमात गुप्तधनासाठी प्रथमेश सगणे या ११ वर्षीय चिमुरड्याचा नरबळी घेण्याचा प्रयत्न झाला.

Get Shankar Maharaj arrested | शंकर महाराजांना अटक करा

शंकर महाराजांना अटक करा

अमरावतीत ‘आक्रमण’
अमरावती : पिंपळखुटा येथील संत शंकर महाराजांच्या आश्रमात गुप्तधनासाठी प्रथमेश सगणे या ११ वर्षीय चिमुरड्याचा नरबळी घेण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये तिघांना अटक झाली असली तरी मुख्य आरोपी शंकर महाराजांना वगळले गेले आहे. आश्रमाचे संचालक म्हणून या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार शंकर महाराजांना तत्काळ अटक करून त्यांच्या ट्रस्टच्या संपत्तीची चौकशी करावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी आक्रमण युवा संघटनेने विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
पिंपळखुटा येथील आश्रमाचे सर्वेसर्वा शंकर महाराज नागपुरे यांनी स्वत:च्या नावे आश्रम काढून विविध शाळा, महाविद्यालये व वसतिगृह सुरू केलेत. शेकडो एकर जमीनही खरेदी केली. पिंपळखुट्यातच नव्हे, तर राज्यात अनेक ठिकाणी शंकर महाराजांनी मोठे आश्रम थाटले आहेत. शंकर महाराजांनी गुप्तधनासाठीच प्रथमेश सगणे या विद्यार्थ्याचा नरबळी घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आक्रमण संघटनेने विभागीय आयुक्तांसह जिल्हा पोलीस अधीक्षक व अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
या भयंकर प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. मात्र, प्रकरणाचे मुख्य सूत्रधार शंकर महाराज यांना अद्यापही अटक झालेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही ‘आक्रमण’च्या पदाधिकाऱ्यांनी केला. शंकर महाराजांजवळ शेकडो एकर जमीन कोठून आली, ही संपत्ती त्यांनी कोठून मिळविली, या प्रश्नांची उकल तातडीने करावी, अशी मागणी आक्रमणद्वारे करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात (इर्विन) विशाल अश्वप्रतिमेचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम बंद करून येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या स्मृतिप्रित्यर्थ असलेल्या स्तंभाची विटंबना थांबवावी, मौजे रहाटगाव येथील शेत सर्वे नं १२१ मधील निराश्रित गरजूंना घरे बांधण्याकरिता जागा द्यावी, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करून कायमस्वरूपी आॅटोरिक्षा स्टँड उभारावे, मागासवर्गीयांवर हेतुपुरस्सरपणे अन्याय करणाऱ्यांविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष सुनील गजभिये यांनी केले. यावेळी महिला आघाडीप्रमुख शीतल पाटील, रवी गवई, मिलिंद लोणपांडे, करीम शहा, सिद्धार्थ आठवले, राजू रौराळे, जयंत राऊत, गजानन आठवले, मंगेश वानखडे, विद्या ढोले, रेश्मा तायडे शीला ढोके, सतीश मकेश्र्वर, देवीदास जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Get Shankar Maharaj arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.