शहरातील विकासकामे तातडीने पूर्ण करा!
By Admin | Updated: January 4, 2017 00:19 IST2017-01-04T00:19:00+5:302017-01-04T00:19:00+5:30
शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी अपूर्ण व प्रस्तावित असलेली विकासकामे तातडीने पूर्ण करा, ...

शहरातील विकासकामे तातडीने पूर्ण करा!
पालकमंत्र्यांचे निर्देश : महापालिकेच्या कामांचा आढावा
अमरावती : शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी अपूर्ण व प्रस्तावित असलेली विकासकामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध विकासकामांचा व योजनांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. मनपा आयुक्त हेमंत पवार, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मजीप्राच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी तसेच मनपातील सर्व विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, अमृत योजना, भुयारी गटार योजना, हागणदारीमुक्त अभियान, स्वच्छ भारत अभियान, पाणीपुरवठा योजना, रमाई आवास योजना आदी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. या योजनांची शहरात अमंलबजावणी करावी. राजापेठ उड्डाणपूल, शिव टेकडी, भीम टेकडी, वडाळी तलाव व उद्यान, प्रमुख रहदारीचे रस्ते आदींची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करावी. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरातील ज्या प्रभागात शौचालयाची कामे प्रलंबित आहेत अशा कुटुंबांची यादी तयार करून त्यांना शौचालय बांधणीसाठी अनुदान उपलब्ध करावेत. मनपाच्या अधिनस्त असलेल्या शाळांची अवस्था व शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शाळेतील स्वच्छता आणि विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्यासाठी बेंचेस आदी सुविधा तातडीने पुरविण्यात याव्यात.
विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी पुरेसा निधी मागणीचे प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवून व त्याचा पाठपुरावा करा. महानगरपालिकांकडे विविध महसूल गोळा करण्याचे माध्यम आहे. या अनुषंगाने मनपाची आर्थिक स्थिती मजबुत करण्यासाठी एलबीटी कर, मालमत्ता कर, होर्डींग्स कर यासह इतर महसूल जमा करण्याच्या बाबींवर लक्ष ठेवण्यात यावे. शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवावी. सर्व नाल्यांचे खोलीकरण व सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापित करावी, अशा सूचना पोटे यांनी बैठकीत दिल्या. पंतप्रधान आवास योजना, अंबादेवी-एकवीरादेवी विकास, नगरोत्थान योजना, परकोट सौंदर्यीकरण, त्रिवेणी अभियान, अनधिकृत बांधकाम, अंबानाला, वडाळी तलाव सौंदर्यीकरण आदींचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.