कालव्याच्या बोगस कामांची लक्तरे वेशीवर
By Admin | Updated: November 15, 2015 00:04 IST2015-11-15T00:04:37+5:302015-11-15T00:04:37+5:30
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाद्वारा करण्यात आलेल्या बोगस कामांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहे.

कालव्याच्या बोगस कामांची लक्तरे वेशीवर
ऊर्ध्व वर्धाच्या अधिकाऱ्यांद्वारा दिशाभूल : म्हणतात जलशिवारमधून होणार कामे
अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या कालवे विभागाद्वारा करण्यात आलेल्या बोगस कामांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहे. मुख्य कालव्यासह लघु कालव्यांचे ठिकठिकाणी फुटलेल्या अस्तरीकरणातून भ्रष्टाचाराचा पाट वाहत आहे. कालव्यालगतचे रस्ते खचले आहे. त्यामुळे कालवे शेतकऱ्यांसाठी वरदान न ठरता डोकेदुखी ठरत आहे. ही कामे आता जलशिवारच्या माध्यमातून करण्यात येतील, असे खोटे विधान जबाबदार अधिकारी करीत असल्याची शोकांतिका आहे.
ऊर्ध्व वर्धा धरणाच्या मुख्य कालव्याचे ३७ हजार कि.मी. अंतरावरील अस्तरीकरण पूर्णत: उखडले आहे. येथेच नव्हे, तर संपूर्ण मुख्य कालवा व लघु कालव्यांना मोठमोठी भगदाड पडली आहेत. कालव्यातील पाणी साठून राहावे यासाठी ठिकठिकाणी अस्तरीकरण करण्यात आले. मात्र, ते उखडले असल्याने लगतच्या शेतात पाणी साचत असल्याने शेतीपीके खराब होत आहेत.
तसेच पाटचऱ्या व लघु कालवे ही झाडाझुडूपांनी बुजली आहेत. त्यामुळे शेतांना पाणी न मिळता अन्यत्र पाणी शिरते. रबीसाठी १११ दिवस पाच पाळ्यांत पाणी देण्याचे नियोजन धरण विभागाने केले आहे. प्रत्यक्षात कालवे, लघु कालवे व पाटचाऱ्या झाडाझुडूपात व गाळात बुजल्या असल्याने रबीच्या सिंचनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हंगामाला सुरुवात झाली आहे. धरण विभागाद्वारा ही कामे आता शासनाचे जलशिवार अभियानांतर्गत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने याबाबत हात झटकले आहे. त्यामुळे धरण विभाग खोटे आश्वासन देत असल्याचा आरोप आहे. (प्रतिनिधी)