उजाड झाली उद्याने

By Admin | Updated: May 3, 2015 00:26 IST2015-05-03T00:26:26+5:302015-05-03T00:26:26+5:30

एकीकडे अमरावतीची ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल सुरू आहे. परंतु शहरातील बहुतांश उद्यानांची सध्याची अवस्था पाहता

The gardens were exposed | उजाड झाली उद्याने

उजाड झाली उद्याने

अमरावती : एकीकडे अमरावतीची ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल सुरू आहे. परंतु शहरातील बहुतांश उद्यानांची सध्याची अवस्था पाहता ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना अस्तित्वात येईल काय? हा प्रश्न पडतो. चिमुकले आणि वयोवृध्दांसाठी साकारण्यात आलेल्या शहरातील ८८ उद्यानांपैकी बहुतांश बगिच्यांची देखभाल, सुरक्षा आदींकडे दुर्लक्ष होत असल्याने ही उद्याने उजाड झाली आहेत. शहरातील मुस्लिमबहुल भागात तर नाममात्र उद्याने आहेत.

महापालिका हद्दीत नवीन, जुने, सार्वजनिक बांधकाम विभाग व सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत उद्याने साकारण्यात आली आहेत. महापालिका उद्यान विभागात मनुष्यबळाचा वानवा ही नित्याचीच बाब असतानासुद्धा काही उद्याने कंत्राट पद्धतीने देखभाल, दुरुस्तीसाठी सोपविण्यात आली आहेत.
वडाळी, छत्री तलाव बीओटी तत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात आले आहे. मुस्लिम बहुल भागात तीन ते चार उद्यानांची संख्या असून असलेल्या उद्यानांची देखभाल कशी करावी, हा प्रश्न आहे. ताजनगर, एहेबाब कॉलनी येथे असलेल्या उद्यानाचे संरक्षण कुंपण जागोजागी तुटलेल्या अवस्थेत आहे. अनेक उद्यानांमध्ये प्रेमीयुगुलांचा मुक्तसंचार सुरक्षा रक्षकाच्या आशीर्वादाने सुरु आहे. काही उद्यानात दिवसाढवळ्या दारूडे धुमाकूळ घालतात. बहुतांश उद्यानांची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी त्याच परिसरातील बेरोजगार संस्थेला देण्यात आली आहे. हबीबनगर, स्वास्तिकनगर, पन्नालालनगर, दस्तूरनगर, मांगीलाल प्लॉटमध्ये असलेल्या उद्यानांची बिकट अवस्था आहे. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत नव्याने साकारण्यात आलेल्या उद्यानांची बिकट अवस्था असून निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचा आरोप आहे. बहुतांश उद्यानांमध्ये पाणी प्रश्न बिकट झाला आहे.
स्लम भागात असलेल्या बहुतांश उद्यानांच्या संरक्षण कुंपणाची चोरी झाल्याने फुलझाडे, वृक्षांचे संगोपन कसे करावे? हा प्रश्न आहे. सिद्धार्थनगर, रतनगंज, बुधवारा, केडियानगर, राजापेठ झेंडा चौक, दस्तूरनगर, शंकरनगर यासह बडनेऱ्यातील शिक्षक कॉलनी, संजीवनी कॉलनी येथील उद्यानात सुरक्षेचा अभाव आहे. दुपारचा सत्रात काही उद्यानात प्रेमीयुगलांचे थवे ही नित्याचीच बाब झाली आहे. यावर अंकुश लावणे गरजेचे आहे.
प्रशांतनगर : अंबानगरीच्या वैभवात भर टाकण्यासाठी काही वर्षांपूर्वी खुल्या जागेवर साकारण्यात आलेले प्रशांतनगर येथील उद्यान हल्ली उजाड झाले आहे. झाडाझुडपांचा थांगपत्ता नाही. देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या कंत्राटदाराने अटींचे पालन केले नसूनही प्रशासनाने आतापर्यंत कारवाई का केली नाही, असा सवाल या भागाचे नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी उपस्थित केला आहे. प्रकाश व्यवस्था बंद असल्यामुळे येथे सहल अथवा बागडण्यास येणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडत आहे. हिरवळ सुकली असून स्ंिपं्रकलरची पाईप लाईन फुटल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. काही दिवसांपूर्वी या उद्यानात नाल्यांच्या पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प साकारला जात असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात आली. परिणामी उद्यानातील ट्रॅक उखडल्याची तक्रार प्रदीप हिवसे यांनी आयुक्तांकडे केली आहे. येथे लग्न समारंभाची परवानगी नसताना लग्न आदी कार्यक्रम केले जात आहे. हे उद्यान नागरिकांसाठी की कंत्राटदारासाठी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीला उद्यानात कायम अंधार राहत असल्याने गैरप्रकाराला येथे खतपाणी टाकले जात असल्याचा संशय नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी व्यक्त केला आहे. गैरप्रकार थांबविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय कागदोपत्रीच राहिल्याचे वास्तव पुढे आले आहे. सांडपाणी शुद्धीकरण 'निरी' प्रकल्पही गुलदस्त्यात आहे.

Web Title: The gardens were exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.