गणोजाला अतिवृष्टीचा तडाखा
By Admin | Updated: June 29, 2015 00:37 IST2015-06-29T00:37:30+5:302015-06-29T00:37:30+5:30
तालुक्यातील गणोजा गावाला, रविवारी दुपारी पावसाने दोन तास झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे गावाच्या शेतशिवाराचे अक्षरश: जलाशयच झाले होते.

गणोजाला अतिवृष्टीचा तडाखा
शिवाराचे झाले जलाशय : पहिली पेरणीही दडपली, संकटांचे संकेत
चांदूरबाजार : तालुक्यातील गणोजा गावाला, रविवारी दुपारी पावसाने दोन तास झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे गावाच्या शेतशिवाराचे अक्षरश: जलाशयच झाले होते. त्यामुळे १८ ते २१ जून या काळात पेरण्यात आलेल्या नालाकाठच्या शेतातील बियाण्यांसह जमीन खरडून निघाली. तालुक्यात झालेल्या या अतिवृष्टीबाबत व शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत तालुक्याचा कृषी व महसूल विभाग मात्र अजूनही अनभिज्ञच आहे.
रविवारी दुपारी २ ते ४ वाजताच्या सुमारास गणोजा परिसरात अतिवृष्टी झाली. शेजारच्या सोनोरी गावालाही या अतिवृष्टीचा तडाखा बसला. त्याचप्रमाणे गणोजा गावाजवळील मोर्शी तहसीलमधील डोमक व तरोडा गावानाही या अतिवृष्टीची झळ मोठ्या प्रमाणात पोहोचली. या अतिवृष्टीमुळे जमिनीत पेरलेल्या तूर, कपाशी व सोयाबीन पिकांना मोड आल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. गावालगतच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे, काठावरील जमीन खरडून गेल्याने कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. गेल्या ५० वर्षांतही असा पूर या नाल्याला आल्याचे आम्ही पाहिलेले नाही, असे गावातील वयोवृध्द शेतकऱ्यांनी सांगितले.
गणोजा हे तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील वसल्यामुळे या गावाकडे नेहमीच प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. ते यावेळीही झाले असल्याची खंत गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. (शहर प्रतिनिधी)