‘गोल्डन गँग’च्या सदस्यांचा पुनर्प्रवेश !

By Admin | Updated: February 25, 2017 00:04 IST2017-02-25T00:04:17+5:302017-02-25T00:04:17+5:30

सत्ता कुणाचीही असो, शब्द आपलाच चालणार, अशी दर्पोक्ती करणारे गोल्डन गँगमधील काही सक्रिय सदस्य सभागृहात पुन्हा शिरल्याची खुसफुस महापालिकेत सुरू झाली आहे.

'Gangan gang members' re-entry! | ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांचा पुनर्प्रवेश !

‘गोल्डन गँग’च्या सदस्यांचा पुनर्प्रवेश !

महापालिका : नवख्यांसह प्रशासनाचीही परीक्षा
अमरावती : सत्ता कुणाचीही असो, शब्द आपलाच चालणार, अशी दर्पोक्ती करणारे गोल्डन गँगमधील काही सक्रिय सदस्य सभागृहात पुन्हा शिरल्याची खुसफुस महापालिकेत सुरू झाली आहे. एखाद-दुसऱ्या जुन्या चेहऱ्यांचा अपवाद वगळता भाजपच्या नवख्या सदस्यांना काबूत ठेवण्यासाठी पुन्हा तेच सदस्य एकत्र येतील, अशी भीती महापालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
मागील काही वर्षात महापालिकेत गोल्डन गँगने राजकिय दहशत निर्माण केल्याने महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे. त्यांना हद्दपार करण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी संपूर्ण बहुमत देण्याचे ‘कॅम्पेन’ भाजपने युद्धस्तरावर राबविले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी तर ‘सैराट’च्या धर्तीवर एक विडंबन गीत लिहून ‘गोल्डन गँग’वर प्रहार केला होता. निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या कालावधीत महापालिकेतील गोल्डन गँगवर टीकेचे आसूड ओढणारे फ्लेक्स शहर भाजपकडून लावण्यात आले होते. भाजपने मुद्रांकावर दिलेल्या शपथपत्रवजा वचननाम्यामध्येही ‘गोल्डन गँग’चा उल्लेख होता. या गँगमधील सदस्यांची नावे तुम्ही का घेत नाही, या प्रश्नावर आ. सुनील देशमुख यांनी पत्रकारांना भाजपच्या प्रचारसभा ऐकण्याचे, त्याला उपस्थित राहण्याचे आवाहनही पत्रकार परिषदेतून केले होते. निवडणुकीदरम्यान पारदर्शी कारभाराची हमी देत महापालिकेतून ‘गोल्डन गँग’ला हद्दपार करण्याचे आवाहन भाजपने केले होते.

अन्य सदस्यांच्या हक्कावर गदा
अमरावती : अशा काही सदस्यांविरोधात मजबूत फिल्डिंग लावण्यात आली होती. तथापि ही फिल्डिंग उधळून लावत काहीजण मोठ्या मताधिक्याने महापालिकेत प्रवेशल्याची चर्चा वर्तुळात रंगली आहे. रावसाहेब शेखावत आमदार असताना विशिष्ट सदस्यांचा समावेश असलेल्या कंपुला ‘गोल्डन गँग’ असे नामानिधान मिळाले होते. अन्य सदस्यांच्या हक्कावर बाधा आणित आणि प्रशासनावर वचक ठेवीत त्यापैकी काहींनी पालिकेवर एकहाती वर्चस्व मिळविले होते. बांधकाम असो वा एडीटीपी, सामान्य प्रशासन असो वा साफसफाई, लेखा असो वा कंत्राट असा सर्वच क्षेत्रात ‘गोल्डन गँग’मधील सक्रिय सदस्यांचा वावर होता, तसे महापालिकेत आजही उघडपणे बोलले जाते. मात्र, नव्याने निवडून आल्याने ते सक्रिय सदस्य नव्या ऊर्जेने पुन्हा एकदा ‘विशिष्ट’ कंपू निर्माण करून महापालिकेवर सत्ता गाजविण्याची भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

भाजपसमोर आव्हान
८७ सदस्यीय सभागृहात तब्बल ४५ जागा घेऊन भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचे सभापतीपद भाजपकडे राहिल, हे ओघाने आलेच. मात्र, मनपात वर्षानुवर्षे असलेल्या काहींवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान सत्ताधीश भाजपसमोर असेल.

Web Title: 'Gangan gang members' re-entry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.