घरकूलप्रकरणी ‘गँग’ खपवून घेणार नाही
By Admin | Updated: July 7, 2015 00:14 IST2015-07-07T00:14:41+5:302015-07-07T00:14:41+5:30
रमाई घरकूलप्रकरणी लाभार्थ्यांच्या नावे महापालिकेत समुहाने गोंधळ घालण्याचा सुरु असलेला प्रकार यापुढे खपवून घेणार नाही,

घरकूलप्रकरणी ‘गँग’ खपवून घेणार नाही
पाठराखण : आयुक्तांचा आंदोलकांना इशारा
अमरावती : रमाई घरकूलप्रकरणी लाभार्थ्यांच्या नावे महापालिकेत समुहाने गोंधळ घालण्याचा सुरु असलेला प्रकार यापुढे खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा आयुक्तांनी आंदोलकांना दिला आहे. गरीब, सामान्यांना या योजनेचा लाभ मिळेल; परंतु ‘गँग’ खपवून घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
गत आठवड्यात बसपाच्या वतीने घरकूल प्रश्नावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी संबंधित अभियंते, एजन्सीच्या कारभारावर ताशेरे ओढले. आयुक्तांनी लाभार्थ्यांची बाजू ऐकून घेतली. मात्र, सोमवारी बसपाचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक मंगेश मनोहरे हे घरकूल लाभार्थ्यांर्ची समस्या घेऊन आयुक्तांच्या दालनात पोहोचले. सहायक अभियंता नितीन बोबडे, आदर्श एजन्सीचे ईचे हे व्यवस्थित काम करीत नाही, अशी तक्रार मनोहरे यांनी केली. दरम्यान आयुक्तांनी अभियंता बोबडे व ईचे यांना बोलावून घेतले. यावेळी अभियंता बोबडे यांनी मंगेश मनोहरे हे दबावतंत्र वापरुन कागदपत्रे घेऊन जातात. विभागात ‘गँग’ घेऊन येतात. असे म्हणताच आयुक्तांनी मनोहरे यांना समज देताना यापुढे ‘गँग’ खपवून घेणार नाही. कामे करायची असेल तर दोनच व्यक्ती सोबत आणा. अन्यथा एकही कामे होऊ देणार नाही, अशी समज दिली. यावेळी मंगेश मनोहरे आणि अभियंता बोबडे, ईचे यांच्यात शाब्दिक वादही झाला. अखेर मनोहरे यांनी समजदारी घेत आयुक्तांचे दालन सोडले.
यादी सादर करा
रमाई आवास योजनेत अभियंते, एजन्सीचे प्रमुख लाभार्थ्यांना पायपीट करावयास लावतात, असा आरोप मंगेश मनोहरे यांनी केला. यावेळी आयुक्तांनी लाभार्थ्यांची यादी सादर करा, त्यांना नक्कीच न्याय मिळेल, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली.
तर एकही काम नाही
गरिबांना घरे मिळाली पाहिजे, या मताचा मी आहे. परंतु अधिकाऱ्यांवर दबावतंत्र आणले जात असेल तर संबंधित प्रभागात एकही काम होवू देणार नाही, असा इशारा आयुक्तांनी यावेळी दिला.