पंढरपुरातील गणपती, कालभैरव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
By Admin | Updated: August 31, 2014 23:28 IST2014-08-31T23:28:49+5:302014-08-31T23:28:49+5:30
एकवीरा देवीचा दाह शांतीकरिता रविवारी सकाळी मंदिरामध्ये होमहवनातून पूर्णाहुती देऊन सांगता करण्यात आली. पंढरपूर येथून मागविलेल्या गणपती व कालभैरवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

पंढरपुरातील गणपती, कालभैरव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
अमरावती : एकवीरा देवीचा दाह शांतीकरिता रविवारी सकाळी मंदिरामध्ये होमहवनातून पूर्णाहुती देऊन सांगता करण्यात आली. पंढरपूर येथून मागविलेल्या गणपती व कालभैरवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नवरात्रीपूर्वी एकवीरा देवीला दागिन्यांचा श्रुंगार चढविण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्यावतीने देण्यात आली.
एकवीरा देवीच्या मूर्तीवरील शेंदुराची खोळ पडल्यामुळे एकवीरा देवीच्या मूळ मूर्तीचे पहिल्यांदाच दर्शन घडले. ही घटना अमरावतीकरांसाठी ऐतिहासिक मानली जात आहे. त्यामुळे भक्तांमध्ये एकवीरा देवीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. तसेच भाविकांच्या भावनांचा विचार करुन विश्वस्त मंडळामध्ये उत्साह दिसून येत आहे. एकवीरा देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घडल्याने रविवारी सकाळी यथायोग्य पूजाअर्चना, अभिषेक, होमहवन करण्यात आले. नागपूर येथील पंडित श्रीकृष्णशास्त्री आर्वीकर यांच्या हस्ते पूजाअर्चना करण्यात आली. दुपारी १ वाजता आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. आता विश्वस्त पुढील तयारीला लागले असून नवरात्री पूर्वी मूर्तीला चांदीचा मुखवटा व त्यावर सोन्याचा मुलामा चढविण्यात येणार आहे. मंदिरात भाविकांची गर्दी वाढत असल्याने तेथील सुख-सुविधांकडे संस्थानचे चंद्रशेखर भोंदू, दीपक सब्जीवाले, शेखर कुळकर्णी, शैलेश वानखडे, परीक्षित गणोरकर, राजेंद्र गणोरकर लक्ष ठेवून आहेत.